माझ्या अंगात दैवी शक्ती, माझं कोणी वाकडं करू शकणार नाही, रुद्राक्षाची भीती दाखवून भोंदूबाबाने महिलेसोबत नको ते केलं; अशोक खरातनंतर 'महेशगिरी'चं भयानक कांड
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा April 23, 2026 11:13 AM

Nashik Crime News: नाशिक (Nashik) जिल्ह्यात भोंदूगिरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण ताजे असतानाच आता निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील एका भोंदू बाबाचा काळा कारनामा उघडकीस आला आहे. कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे कुटुंब घरगुती ताणतणाव आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त होते. यावर तोडगा काढण्यासाठी ते धरणगाव येथील महेशगिरी याच्या तथाकथित 'प्रति गाणगापूर' मठात गेले. यावेळी भोंदू महेशगिरीने महिलेला "बाहेरची बाधा" असल्याचे सांगून भीती घातली. विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यास लावून, ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडले.

Nashik Crime News: व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज

काही दिवसांनी या भोंदूने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. "दैवी विधी आणि मार्गदर्शनासाठी एकांतात यावे लागेल" असे सांगून त्याने पीडितेला नाशिकमध्ये बोलावून घेतले. तिथून तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. "माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही," अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले.

Nashik Crime News: अंनिसच्या मदतीने पोलिसांत धाव

भोंदूच्या दहशतीमुळे पीडित महिला सुरुवातीला गप्प होती. मात्र, तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डॉ. टी. आर. गोराणे आणि कृष्णा चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घालण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime News: इतर महिलांचेही शोषण झाल्याची शक्यता

या भोंदूने अशाच प्रकारे अनेक महिला आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची शक्यता पीडितेने आणि अंनिसने व्यक्त केली आहे. या गुन्ह्यात भोंदूला मदत करणाऱ्या साथीदारांनाही सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपीच्या अटकेसाठी रवाना झाले असून अधिक तपास सुरू आहे.

आणखी वाचा 

Kalpana kharat bail reject मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.