प्रियकराला रोमान्सच्या जाळ्यात अडकवून त्याला क्रूर पद्धतीने संपवण्याचं प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रेरणाला अटक केली आहे. प्रेरणा आणि किरण दोघे 27 वर्षांचे आहेत. ते टेलिकॉमच्या दुकानात नोकरीला होते. तिथेच त्यांच्यात प्रेम बहरलं. रिलेशनशिप सुरु झाली. पण पुढे जाऊन या प्रेमाचा असा शेवट होईल, अशी कोणी कल्पनाच केली नसेल. खूप थंड डोक्याने पूर्ण प्लानिंग करुन प्रेरणाने प्रियकराला संपवलं. घरात कोणी नव्हतं, तेव्हा तिने किरणला बोलावलं. एकांत मिळेल म्हणून किरण सुद्धा तिथे गेला. वेस्टर्न स्टाइलने प्रपोज करण्याचा तिने बहाणा बनवला.
किरणनेतिला टोकलं सुद्धा, हे तू काय करते आहेस. पण आज वेगळ्या पद्धतीन प्रपोज करतेय असं प्रेरणाने उत्तर दिलं. नवीन काही तरी म्हणून त्याने सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला. प्रेरणाने किरणचे डोळे बांधले. त्याला खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय बांधले. नंतर त्याला पेटवून दिलं. धक्कादायक म्हणजे तिने या सगळयाच मोबाइल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग केलं. ते 12 मिनिटांचं मोबाइलमधलं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. हा महत्वाचा डिजिलट पुरावा आहे. प्रेरणाने दक्षिण बंगळुरुमधील अंजानापुरा येथील तिच्या घरी किरणला बोलावलं होतं.
इतका टोकाचा निर्णय प्रेरणाने का घेतला?
ज्या मुलावर इतकं प्रेम केलं, त्याला संपवण्याचा इतका टोकाचा निर्णय प्रेरणाने का घेतला? त्यामागची खरी कारणं काय आहेत, ते आता समोर आलं आहे. प्रेरणा आणि किरण मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्यात मागच्या काही काळापासून भांडणं सुरु झालेली असं पोलिसांनी सांगितलं. किरण प्रेरणासोबत असताना सतत त्याच्या पूर्व प्रेयसीबद्दल बोलायचा. हे प्रेरणाला आवडत नव्हतं. प्रेरणामध्ये आणि त्याच्यात यावरुन बऱ्याचदा वादही झालेला. पूर्व प्रेयसीविषयी बोलण्यावरुन ती त्याला सतत टोकायची. ती लग्नासाठी सुद्धा किरणच्या मागे लागलेली.
त्यामुळे प्रेरणाचा राग वाढत चाललेला
पण किरण लग्नाला तयार होत नव्हता. तो दोघांची जात वेगवेगळी असल्याचं कारण देत होता. त्यामुळे प्रेरणाचा राग वाढत चाललेला. प्रेरणाचं वागणं त्याला विचित्र वाटायचं. म्हणून आपण तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणार नाही हे त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं होतं. किरणला आपल्यासोबत रहायचं नाही हे प्रेरणाला कळलेलं.
ज्वलनशील द्रव एकत्र करुन बाथरुममध्ये ठेवलेले
त्यामुळे तिने किरणला संपवण्याचा निर्णय घेतलेला. तिने त्यासाठी चार लीटर रॉकेल विकत घेतलेलं. एक बॉटलमधून पेट्रोल आणलेलं. तिने हे दोन्ही ज्वलनशील द्रव एकत्र करुन बाथरुममध्ये ठेवलेले. किरण तिच्या घरी आला, त्यावेळी तिने आज सरप्राइज देणार असं सांगून बॉयफ्रेंडला कपडे काढायला लावले. त्याचे डोळे रुमालाने बांधले. हात-पाय बांधले. नंतर त्याच्या अंगावर मिक्स केलेलं पेट्रोल-केरोसिन टाकलं आणि पेटवून दिलं.