Jalgaon Crime: 'तुमचा शनी काढून देतो', दोन भोंदू बाबांनी…जळगावच्या बसस्टँडवर नेमकं झालं काय? तुम्हीही सावध राहा
Tv9 Marathi April 23, 2026 01:45 PM

Jalgaon Two Thugs looted Old Man: राज्यात भोंदूबाबांचे अफाट पिकं आलं आहे. धार्मिक विधीचे भूत घालून, अघोरी पूजा बांधून अथवा धर्मांतरणासाठी हे भोंदूबाबा महिलांना आणि भाविक भक्तांची लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. जळगाव बसस्टँडवरही असाच प्रकार घडला आहे. ‘तुमचा शनी काढून देतो’ असे सांगत जळगावच्या बसस्थानकात दोन भामट्यांनी वृद्धाला गंडवले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पण दोन्ही भामटे फरार झाले आहेत.

‘तुमचा शनी काढून देतो’

67 वर्षीय गजानन विठोबा सर्जेराव हे बसस्टँडवर कामानिमित्त गेले होते. तिथे दोन भोंदू बाबा त्यांना भेटले. त्यांनी तुमच्यावर शनीची महादशा सुरू आहे. तुमचे नुकसान होणार आहे, अशी भीती घालत ‘तुमचा शनी काढून देतो’ अशी थाप मारली. अंगावर शनी असल्याचे सांगून भीती घालून वृद्धाची दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 900 रुपये लंपास केले. 20 एप्रिल रोजी ही घटना नवीन बसस्थानकात घडली. दुसर्‍या दिवशी सर्जेराव यांच्या तक्रारीनंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोन्याची अंगठी व रोकड लांबविल्यानंतर अज्ञात दोघेही फरार झाले आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

हातचालखी दाखवून विश्वास संपादन

जिल्हा बँक कॉलनीमधील गजानन सर्जेराव यांच्या मुलीकडे घरभरणीचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते बसस्थानकावर आले होते. त्यावेळी एक भामटा त्यांच्याजवळ आला. त्याने शेगावच्या बसविषयी त्यांच्याकडे चौकशी केली. त्याचवेळी दुसरी व्यक्ती त्यांच्याकडे आली. तिने रस्त्यावरील एक खडा उचलण्यास सांगितले. सर्जेरावांकडून तो खडा हातात घेतला आणि तीन वेळा राम राम राम असे म्हटले. मूठ उघडताच खड्याऐवजी रुद्राक्ष हातात असल्याचे दाखवले. त्याने हातचालाखी केली. सर्जेरावांचा विश्वास संपादन केला.

बंद पोलीस चौकीजवळच लुटले

सर्जेराव यांनी पुढील चमत्कार दाखवण्यासाठी बसस्थानकावरील बंद पोलीस चौकीजवळ नेले. तिथे सोबतच्या व्यक्तीला हातातील कडे काढण्यास सांगितले. सर्जेराव यांना त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी आणि खिशातील पैसे काढण्यास सांगितले. सोबतच्या व्यक्तीच्या हातात ते ठेवण्यास सांगितले. सर्जेराव यांना मागे न पाहता पुढे जाण्यास सांगितले. सर्जेराव पुढे आल्यावर थांबले. त्यांनी मागून वळून पाहिले असता, दोन्ही भामटे पसार झालेले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्जेराव यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात दोघांविरोधात पोलीस तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.