IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा
esakal April 23, 2026 06:45 PM

राजधानी दिल्लीत वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याच्या २१ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या राहुल मीणा याला बुधवारी अटक करण्यात आली. त्याला द्वारकेतून ताब्यात घेतलं. आरोपीची रात्री उशिरा पोलिसांनी चौकशी केली असता त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी राहुल हा अधिकाऱ्याच्या घरी कामासाठी होता. महिन्याभरापूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.

राहुल मीणा याला त्या अपार्टमेंटमध्ये कुठं कोणतं लॉक आहे, ते कसं उघडायचं याची पूर्ण माहिती होती. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तो इमारतीत घुसला आणि थेट मुलीच्या स्टडी रूमध्ये पोहोचला. फ्लॅटच्या रूफवरच स्वतंत्र अशी स्टडीरूम होती. विशेष म्हणजे आरोपीने ३ पासवर्ड आणि एक किल्ली असलेली चार लॉक उघडली होती.

भरधाव ट्रकने ३ गाड्यांना धडक दिली, बोलेरो पेटून ६ जण जिवंत जळाले; ११ भाविकांचा मृत्यू

अधिकाऱ्याची मृत मुलगी युपीएससीची तयारी करत होती. दररोज सकाळी तिचे आई-वडील जिमला जातात याची कल्पना राहुलला होती. ते जिमला गेल्यानंतरच राहुल घरात घुसला होता. त्यानं तरुणीचा गळा दाबला आणि तिच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. तिने प्रतिकार केला पण जवळच असलेल्या लँपच्या स्टँडने राहुलने प्रहार केला. यामुळे तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला आणि ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध असतानाच राहुलने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळला.

आरोपी राहुलला घरात चोरीही करायची होती पण घराचे लॉकर थंब इंप्रेशनने उघडत होते. त्यामुळे त्याने तरुणीला स्टडी रूममधून खाली रूमध्ये ओढत आणलं. तिच्या रक्ताने माखलेल्या बोटांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झालं नाही.

लॉकर उघडत नसल्यानं तिला तिथंच जमिनीवर फेकून त्याने लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून जितके दागिने आणि रोकड निघाली ती बॅगेत भरली. दरम्यान, या सगळ्या प्रकारात त्याच्या पँटला आणि बुटांना रक्त लागलं होतं. त्याने त्याची पँट आणि बूट तिथेच काढून टाकले. तिजोरीतून तिच्या भावाची पँट आणि चप्पल घालून फरार झाला.

धक्कादायक बाब म्हणजे राहुलने आदल्या दिवशी एका विवाहित महिलेवर बलात्कार केला होता. राहुलला ऑनलाइन गेमचा नाद लागला होता. यातून पैसे कमावून तो तरुणींना जाळ्यात ओढत असे. त्याने अलवरमद्ये २१ एप्रिलला शेजारच्या विवाहित महिलेवर बलात्कार केला. तिच्या शरीरावर चावा घेत जखमा केल्या होत्या. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दिल्लीला आला होता.

दिल्लीत त्याने आधी आयआरएस अधिकाऱ्याकडे नोकरी केली होती. त्याला घराची खडान्खडा माहिती होती. कामावरून काढून टाकल्याचा राग त्याच्या मनात होताच. सकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्याने घरात घुसून अधिकाऱ्याच्या तरुण मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. अधिकाऱ्याची मुलगी बारावीत ऑल इंडिया टॉपर होती. युपीएससी करण्याचं तिचं स्वप्न होतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.