पूरनची विकेट काढताच रवींद्र जडेजाने खिशात हात घातला, विचित्र सेलिब्रेशनचा सामन्यानंतर केला खुलासा
GH News April 23, 2026 09:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 32व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गोलंदाजीत लखनौ सुपर जायंट्सचा वरचष्मा दिसला. पण फलंदाजीत पूर्णपणे फेल गेले आणि 159 धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी 18 षटकात 119 धावांवर लखनौ सुपर जायंट्सला रोखलं. हा सामना राजस्थान रॉयल्सने 40 धावांनी जिंकला. या सामन्यात विशेष कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने या सामन्यात 29 चेंडूत 43 धावांची खेळी केली आणि एक विकेटही घेतला होता. त्याच्या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सला 150 पार धावा करण्यास मदत झाली. कारण या खेळपट्टी फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने निकोलस पूरनची विकेट काढली आणि त्याने विचित्र सेलीब्रेशन केलं. त्याच्या या सेलीब्रेशनचा अर्थ काय? हे अनेकांना कळलं नाही. सामन्यानंतर त्याने याबाबत सांगितलं.

आयपीएल स्पर्धेतील या विजयानंतर रवींद्र जडेजाने सांगितलं की, ‘सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. मला हा पुरस्कार गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांना (माझ्या पत्नीला) समर्पित करायचा आहे. माझ्या पत्नीने मला काल सांगितले होते की, आज मी अधिक चांगली कामगिरी करेन आणि मी तेच करून दाखवले. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, कारण चेंडूला सीम आणि स्विंग दोन्ही मिळत होते.’ निकोलस पूरनची विकेट काढल्यानंतर रवींद्र जडेजाने शैली दाखवली; त्याने फलंदाजाकडे बोट दाखवून आपल्या खिशाकडे इशारा केला. सामन्यानंतर जडेजा म्हणाला, “हो, निकोलस पूरन माझ्या खिशात आहे. हा विचार अचानक माझ्या मनात आला आणि मी अगदी तसेच केले.”

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात 10 गुण पडले आहेत. तर नेट रनरेट हा +0.790 इतका आहे. या विजयापूर्वी राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानावर होता. आता 7 पैकी तीन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.