महिला क्रिकेटला मोठं व्यासपीठ!
esakal April 23, 2026 10:45 PM

महिला क्रिकेटला मोठे व्यासपीठ!
‘सकाळ प्रीमियर लीग २०२६’ची घोषणा

२५ एप्रिलला बोरिवलीत रंगणार महिला क्रिकेटचा जल्लोष; विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची लयलूट

मुंबई, ता. २३ : महिला क्रीडापटूंना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सकाळ मीडिया ग्रुपतर्फे ‘सकाळ प्रीमियर लीग २०२६ - महिला क्रिकेट स्पर्धा’ जाहीर करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (ता. २५) बोरिवली (प.), गोराई-३ येथील फोर्स टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून, मुंबईतील महिला क्रिकेटपटूंमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही स्पर्धा ओपन कॅटेगरी अंडर आर्म टेनिस बॉल स्वरूपात खेळवण्यात येणार असून, एकूण २० संघांना सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धेची रचना गट पद्धतीने करण्यात आली असून, प्रत्येक संघाला किमान चार सामने खेळण्याची हमी आयोजकांनी दिली आहे. सामन्यांचे स्वरूप पाच षटकांचे असणार असून, प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त दोन षटके टाकण्याची मर्यादा असेल. सहभागी खेळाडूंना दिवसभरासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि हाय-टी देण्यात येणार आहे, ज्यामुळे स्पर्धेचा अनुभव अधिक सुखद होणार आहे. यासाठी असोसिएट स्पॉन्सर म्हणून रिलायन्स डिजिटल आणि सेनसोडंटचे विशेष सहकार्य लाभले आहे.

---------------------
आकर्षक बक्षिसांची मेजवानी
विजेत्या संघाला रु.५० हजार व ट्रॉफी, तर उपविजेत्या संघाला रु.२५ हजार व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी रु. पाच हजार व ट्रॉफी, तर सीरिजमधील सर्वोत्तम खेळाडूला रु.१० हजार व ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.