पुण्यातील कात्रज घाटात भीषण अपघात, बसच्या धडकेत रिक्षाचा चेंदामेंदा; 1 ठार 3 गंभीर
Pune Accident : पुण्यात अपघाताची (Pune Accident) भीषण घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकी तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. एसटी बस साताऱ्याच्या दिशेने जात होती तर रिक्षा पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळत आहे.
रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू, जखमींवर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
पुण्यातील कात्रजच्या घाटामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रीक्षा .आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पिकअपची दुचाकीला जोरादार धडक, एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू
वाशिम जिल्ह्यात भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम मंगरुळपीर महामार्गावर पारडी टकमोर गावाजवळ आंबे वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातनंतर पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या शेतात खाली पलटी झाला आहे. पिकअप वाहनात या धडकेत वारा देपुळ गावातील एकाच कुटंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात भरधाव टिप्परने माय-लेकाला चिरडले, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
गोंदियाच्या तिरोडा शहरातील सुकडी नाका परिसरात आज सायंकाळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. ज्यामध्ये माय-लेकाचा जागीच
मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. काटी-बिरसोला येथील रहिवासी असलेले चौधरी कुटुंब मोटारसायकलने प्रवास करत असताना सुकडी नाका परिसरात पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर स्वार असलेल्या हंसलता चौधरी (वय 35) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तन्मय चौधरी हे दोघेही चिरडले गेले आणि त्यांचा जागीच
मृत्यू झाला. मोटारसायकल चालक कामस धर्मदास चौधरी हे या अपघातात जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघात घडल्यानंतर आरोपी टिप्पर चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेहांचा पंचनामा केला आणि ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.