विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे
esakal April 24, 2026 02:45 AM

ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच रस्ता सुरक्षा आणि वाहतूक शिस्तीचे धडे मिळावेत, यासाठी पोलिस व शिक्षण विभागाने संयुक्त पुढाकार घेतला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण कक्षात आठ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात १७३ शाळांतील शिक्षकांनी सहभाग घेतला असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत वाहतूक शिस्तीचे ज्ञान पोहोचवले जाणार आहे.
ही कार्यशाळा १५ ते २२ एप्रिलदरम्यान पार पडली. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण; तसेच शिक्षण विभाग यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय समन्वय अधिकारी दिलीप स्वामी आणि मणीलाल शिंपी यांच्या नेतृत्वात कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. रोड सेफ्टी प्रशिक्षक वैभव काळे यांनी शिक्षकांना प्रत्यक्ष मैदानावर परेड, वाहतूक नियमन यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार आणि अग्निशमन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. नागरी संरक्षण दलाचे चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांनीही कार्यशाळेला भेट देऊन प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन दिले. उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळा व महाविद्यालयात ‘रस्ता वाहतूक सुरक्षा दल’ आणि ‘नागरी संरक्षण पथक’ स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना लहान वयातच वाहतूक शिस्त व रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या माध्यमातून ही माहिती प्रभावीपणे पोहोचवली जाईल. शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भविष्यात विद्यार्थी वाहतूक शिस्त पाळणारे नागरिक बनतील. हे विद्यार्थी रस्ता सुरक्षा सप्ताह, राष्ट्रीय कार्यक्रम, धार्मिक सण व स्थानिक उत्सवांमध्ये सक्रिय भूमिका बजावतील.
- पंकज शिरसाट, वाहतूक उपायुक्त

ठाणे : विद्यार्थ्यांपर्यंत वाहतूक शिस्तीचे ज्ञान पोहचवण्यासाठी शिक्षकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.