Ashok Kharat Crime News: राज्यभर गाजत असलेल्या भोंदूगिरी आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) याच्या संपत्तीचे नवे पुरावे आता उरणमधून समोर येत आहेत. खरातने उरण तालुक्यातील चाणजे येथे अत्यंत कमी किमतीत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशोक खरातचा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवर डोळा होता, असे दिसून येत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अशोक खरातला ज्या दिवशी (17 मार्च) पोलिसांनी अटक केली, नेमक्या त्याच दिवशी उरणमधील या जमिनीच्या व्यवहाराची 'वर्दी नोटीस' प्रसिद्ध करण्यात आलीय. आरोपी पोलिसांच्या बेड्यांत असताना त्याच्या मालमत्तेची प्रक्रिया सुरू राहणे, हा केवळ योगायोग नसल्याची चर्चा आहे.
चाणजे येथील या जमिनीचा सध्याचा बाजारभाव 3 ते 4 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र, हा व्यवहार केवळ 58.50 लाख रुपयांत दाखवण्यात आला आहे. 'तिसरी मुंबई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात भविष्यात जमिनीचे भाव गगनाला भिडणार आहेत, हे ओळखूनच खरातने या भागातील जमिनीवर आपला डोळा ठेवला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
अशोक खरात कोठडीत असतानाही, 13 एप्रिल रोजी या जमिनीची फेरफार नोंद मंजूर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सामान्य नागरिकांना महिना-महिना चकरा मारायला लावणाऱ्या महसूल विभागाने, एका अट्टल आरोपीसाठी महिनाभरात प्रक्रिया पूर्ण केल्याने संबंधित अधिकारीही संशयाच्या भोऱ्यात सापडले आहेत.
अशोक खरातच्या नावावर नाशिक, सिन्नर आणि आता उरणमध्ये अनेक बेनामी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उरणमधील हा संशयास्पद व्यवहार आणि त्याला मिळालेली प्रशासकीय साथ, या सर्वांची चौकशी आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भोंदू महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला पोलिसांनी अटक केली आहे. लैंगिक शोषण आणि जादूटोण्याच्या गुन्ह्यांप्रकरणी लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री सुमारे दीड वाजता ही कारवाई केली. आरोपीला निफाड येथील न्यायालयात हजर केले जाणार असून, अधिक तपासासाठी पाच ते सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा