'पैसे देऊ शकत नसशील, तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव', सावकाराची संतापजनक मागणी, बापाने थेट काटा काढला; नागपूर हादरलं!
जयदीप मेढे April 24, 2026 02:13 PM

Nagpur Crime News: नागपूर शहरातील नारा घाट परिसरातील पिवळी नदीच्या पुलाखाली एका पोत्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांची हाव आणि एका मुलीच्या अब्रूवर टाकलेली वाईट नजर एका तरुणाच्या जीवावर बेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी 40 वर्षीय ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याला ताब्यात घेतले आहे.

Nagpur Crime News: नेमकी घटना काय?

राहुल सुनील साहू (रा. झिंगाबाई टाकळी) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो सदर परिसरातील अचरज टॉवरमध्ये 'हॅप्पी डे' नावाचे हॉटेल चालवत होता. काही दिवसांपूर्वी नारा घाट पुलाखाली नागरिकांना एका पोत्यात मृतदेह आढळला होता. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला असता, राहुलच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांचा संशय ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याच्याकडे वळला.

Nagpur Crime News: सावकारी पाश आणि अश्लील मागणी

पोलिसांनी नवीनला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने दिलेल्या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. कोरोना काळात नवीनने राहुलकडून काही पैसे व्याजाने घेतले होते. नवीनच्या दाव्यानुसार, त्याने व्याजासह दुप्पट रक्कम परत केली होती. तरीही राहुल त्याच्याकडे आणखी 35 हजार रुपयांची मागणी करत होता. घटनेच्या दिवशी राहुल पैसे घेण्यासाठी नवीनच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राहुलने यावेळी "पैसे देऊ शकत नसशील, तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव," अशी अत्यंत अश्लील आणि शारीरिक संबंधाची मागणी केली.

Nagpur Crime News: संतापाचा उद्रेक आणि धक्कादायक कृत्य

आपल्या मुलीबद्दलचे ते गलिच्छ शब्द ऐकून नवीनचा संयम सुटला. यानंतर त्याने जवळच असलेला लोखंडी रॉड उचलला आणि राहुलच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नवीनने पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी राहुलचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि स्वतःच्याच ई-रिक्षातून नेऊन मध्यरात्री नारा घाट पुलाखालील पिवळी नदीत फेकून दिला. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी नवीन पुंडकर याला अटक करण्यात आली आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Crime News: अशोक खरातचा 'तिसऱ्या मुंबई'वर होता डोळा, 3 कोटींची जमीन अवघ्या 58 लाखांत लाटली; अटकेच्या दिवशीच हालचाली!

Mumbai Crime : 'आजकल हिंदू लड़कियों को मुस्लिम पसंद है'; सोबत काम करणाऱ्या सहकारी तरुणीला आक्षेपार्ह मेसेज, नको ती मागणी, नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.