America And Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच जात आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. परंतु इराणच्या आण्विक कार्यक्रमावर दोन्ही देशांचे एकमत होत नसल्याने युद्ध थांबवण्याचा निर्णय प्रलंबित आहे. दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीत परिस्थिती जास्तच बिकट होत आहे. अमेरिकेकडून होर्मुझमध्ये नाकेबंदी केली जात आहे. तर दुसरीकडे इराणेही होर्मुझ बंदच राहील, अशी टोकाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तुमच्याकडे वेळ कमी आहे, असे म्हणत इराणला गंभीर इशारा दिला आहे. तसेच त्यांनी इराणवर अणूहल्ला करणार की नाही, याबाबतही अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना इराणकडे खूपच कमी वेळ शिल्लक राहिला आहे. आम्हाला युद्ध संपवण्याची घाई नाही. परंतु इराणच्या हातातून वेळ जात आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणविरोधात तुम्ही अणबॉम्बचा वापर करणार का? असा प्रश्न एका पत्रकाराने केला. याला उत्तर देताना हा मुर्खपणाचा प्रश्न आहे. आमच्या पारंपरिक शस्त्रांच्या मदतीनेच इराणला मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अणूहल्ला करण्याची गरजच नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा वापर करू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एकीकडे आम्ही युद्धसमाप्तीसाठी प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प यांच्याकडून सांगितले जात आहे. परंतु दुसरीकडे अमेरिका मध्य आशियात सैन्याची ताकद वाढवत आहे. अमेरिकेने USS जॉर्ज H.W. बुश ही तिसरी विमानवाहू युद्धनौका पश्चिम आशियात पाठवली आहे. याआधी पश्चिम आशियात अमेरिकेने USS अब्राहम लिंकन आणि USS जेराल्ड आर. फोर्ड या युद्धनौका पाठवलेल्या आहेत. त्यामुळे इराणने अटी मान्य न केल्यास अमेरिका मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. त्यामुळे सध्या अमेरिका अण्वस्त्रांचा वापर करणार नसला तरीही लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.