शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. उच्च शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं पूर्वीच्या काळचं चित्र होतं. मात्र कालौघात हे चित्र उलटं झालं आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आजची युवा पिढी शेतीकडे पाठ फिरवून रोजगाराच्या संधी शोधत शहराकडं धाव घेत आहे. परिणामी गावं आणि शेती ओस पडत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तरुण शेतीकडे पुन्हा कसा वळेल आणि तो पुन्हा या जगाचा पोशिंदा बनेल या भूमिकेतून बातम्यांच्या विश्वात अढळ स्थान निर्माण करणारी वृत्तवाहिनी टी.व्ही. 9 मराठी ने पुढाकार घेतला. यासाठी मराठवाड्याच्या राजधानीचं शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केली महाराष्ट्राचा महासंकल्प ॲग्रिकल्चर कॅान्क्लेव 2026.
शेतीतुन समृद्धीकडे ही थीम घेऊन ही कृषी परिषद पार पडली. इथल्या तारांकीत हॅाटेल हयात प्लेस इथं बुधवार २२ एप्रिल रोजी टी.व्ही.9 मराठीच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील शेतीला नवी दिशा देणारा महाराष्ट्राचा महासंकल्प अॅग्रीकल्चर कॅान्क्लेव्हचा अतिशय देखणा सोहळा पार पडला. शेतीतुन समृद्धीकडे या संकल्पनेवर आधारीत आधारीत या कृषी परिषदेमध्ये कृषी, उद्योग, शिक्षण, शासन , प्रशासन क्षेत्रातील दिग्गजांचे विचार ऐकण्यासाठी कृषी महाविद्यालये, कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, लघूउद्योजक शेतकरी यांनी सभागृह तुडूंब भरले होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाने या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली.
प्रारंभी टी.व्ही.9 मराठीच्या वतीने आजवर यशस्वीपणे आयोजन करणायात आलेल्या इन्फ्रा कॅान्क्लेव, रिअल इस्टेट कॅान्क्लेव, न्यू एज्यूकेशन पॅालिसी कॅान्क्लेव, स्पोर्टस कॅान्क्लेव, इन्फ्रा अॅण्ड हाऊसिंग कॅान्क्लेव, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॅान्क्लेव याविषयीचा धावता आढावा घेणाऱ्या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्या.
या कृषी परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित मान्यवरांशी भुषण करंदीकर आणि जान्हवी सावंत यांनी संवादसेतू बनत त्यांना बोलतं केलं आणि शेतीतून समृद्धीकडं जाण्यासाठी आज काय करणं गरजेचंआहे, शेतीचं सध्याचं चित्र याविषयीचे एक एक पदर उलगडत गेले. यावेळी शेतीचे पारंपारिक स्वरुप बदलून कृषीउद्योग बनवण्यासाठी उद्योजकासारखा विचार करावा लागेल. एका उत्पादनावर, एका ग्राहकावर अवलंबून न राहता पिक पद्धतीमध्ये बदल, अर्थिक नियोजन करावे लागेल. तसेच शेतीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तरच शेतीला चांगले भवितव्य असल्याचे मत मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले. या कृषी परिषदेच्या आयोजनामागचा उद्देश प्रास्ताविकातून टी.व्ही.9 मराठी चे महाराष्ट्राचे बिजनेस हेड व प्रेसिडेंट भूषण खोत यांनी स्पष्ट केला.
या कृषी परिषदेत बोलताना महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी म्हटले की, टी.व्ही. 9 ने अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. आजचा युवक शेतीपासून दूर जात आहे या विषयावर चर्चा होणे ही काळाची गरज आहे. शेतीतील प्रॅाफीट मार्जीन वाढले तर युवक शेतीकडे वळतील. उद्योगामध्ये पैसा आहे, शेतीमध्ये फार काही नाही हा अपप्रचार थांबवला गेला पाहिजे. एकीकडे शेतकऱ्याला जगाचा पोषिंदा म्हणायचे आणि दुसरीकडे शेतीला निकृष्ट दर्जा द्यायचा हे चित्र बदलावे लागेल.
ग्रामीण भागातील जे तरुण शेती न करता शहराकडे वळत आहेत. ते शेतीकडे वळले तर नाविण्यापूर्ण शेती पुन्हा होऊ शकते. शेतीला फार मोठी शक्ती मिळणार आहे. बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांचे खच्चीकरण होते. मानसिक खच्चीकरणामुळे फार मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे, त्यांचे भरघोस उत्पादन व्हावे, बियाणे उत्पादनावर विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. युवकांमध्ये शेतीविषयीची जागरुकता आणली पाहिजे, शेतीतुन नफा होईल पैसा येईल याचा विश्वास निर्माण करुन द्यावा लागणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे. युवकांना कृषि विज्ञान केंद्रा, कृषी विद्यापीठे, शासनस्तरावरुन प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून, राज्यसरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
बँकाकडून केवळ पिककर्ज देण्यापूरते अर्थसहाय्य करण्यापुरते मर्यादित न राहता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी, यंत्रसामग्री खरेदीसाठी, प्रशिक्षणासाठी कर्ज दिले पाहिजे. युवक नवतंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात त्यांचा शेतीत खूप फायदा होईल. युवक जोखीम घेवू शकतात यासाठी त्यांनी स्वतः होऊन शेतीकडे वळतील तेंव्हा शेतीत चांगली प्रगती होऊ शकेल. युवकांमध्ये अवेरनेस, अॅश्यूरन्ससाठी शासन काम करत आहे. शेतमालाला आधारभूत किंमत दिली जाईल याचा विश्वास सरकारकडून दिला जात आहे यामुळे युवक शेतीकडे नक्कीच वळतील.शेती म्हणजे केवळ शेतामध्ये जाऊन काम करणेच नव्हे तर शेती, प्रक्रिया उद्योग असे अॅग्रो इंडस्ट्री, अॅग्रोबेस इंडस्ट्री, अॅग्रो सर्विस इंडस्ट्री याच्याशी युवक जोडला गेला तर बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न सुटेल आणि युवक शेतकरी कडे वळतील. तसेच ग्रामीण भागात राहून यशस्वीपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, शेतीच्या यशोगाथा पुढे आल्या पाहिजेत तर शेतीला आणि युवकांना सोन्याचे दिवस येतील.
उद्योजक राज भोगले यांनी म्हटले की, शेतीला उद्योग बनवायचे असेल तर त्यापूर्वी एक उद्योजक जसा आपल्या उद्योगाच्या विस्ताराचा विचरा करतो, संसाधने वापरतो तसा शेतीला उद्योग करताना विचार करण्याची गरज आहे. उद्योगाला दर महिन्याला उत्पन्न लागत असते एका उत्पादनावर आणि एका ग्राहकावर उद्योजक अवलंबून राहत नाही यासाठी शेतकऱ्यांनही वेगवेगळी पिके लावली पाहिजेत. एका पिकात नुकसान झाले तर ते दूसऱ्या पिकातून भरुन निघेल. आपल्या आजूबाजूचे जे पिक घेतात तेच आपण घ्यावे हा अट्टहास करु नये, वेगळे पिक लावावे आणि तेही टप्प्यटप्याने याचे काही शेतकरी उदाहरणे आहेत.
शेती करताना नियोजन करावा लागणार आहे. तसेच उत्पादीत मालाचे मार्केटींग झाले पाहिजे यासाठी ज्यांनी आधीपासून बाजारात जम बसवला आहे त्यांच्याशी जोडले जावे सुरुवातीला मोठ्या कंपन्यांशी करार करा त्यांना जे अपेक्षित आहे ते चांगले आणि गुणवत्तापूर्ण पिकवावे. शेतीचे नकारात्मक चित्र बदलावे लागेल. नकारात्मक चित्र राहिले तर शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले भविष्य नाही. जोपर्यंत सकारात्मक दृष्टीकोन तयार होणार नाही, शेतीबद्दल चांगले बोलणार नाही तोवर शेतीला चांगले भविष्य नाही सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तरच शेतीला चांगले भविष्य राहणार आहे. शेतीकडे पाहण्याचा नकारात्मक भावना हळू हळू कमी करुन ती संपवली तरच शेतीचे भविष्य चांगले राहिल यात शंका नाही.
विक्रम सीडसचे सीईओ रितेश मिश्रा यांनी म्हटले की, आजचा काळ तंत्रज्ञानासाठी फार महत्वाचा काळ आहे. आज ग्रामीण आणि शहरी तरुण असा काहीच फरक राहिला नाही. मोबाईलच्या तंत्रज्ञानाने फार मोठी क्रांती घडवली आहे. ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आता मोबाईलवर बघून बियाणे खरेदी करत आहेत. एआयमध्ये प्रमूख तीन स्तंभ आहेत यामध्ये शेतीचा पाया मजबूत करणे, डिजीटल अॅग्रिकल्चरद्वारे शेतकऱ्यांचा आणि पिकांचा डेटा गोळा केला गेला आहे. आजपर्यंत देशात पाच ते सात कोटी फार्मर आयडी तयार झालेले आहेत.
शेतीचा पाया चांगला झाला तर त्यांच्यापर्यंत कोणत्या सुविधा पोचवायच्या याचे नियोजन करता येणार आहे. धोरणे या तीन स्तंभावर भर दिल्यास एआय तंत्रज्ञान शेतीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मशीन लर्निंगद्वारे पिकावर येणाऱ्या रोगाचा डेटा जमा करुन रोग येण्यापूर्वीच खबरदारीचे उपाय करता येणार आहेत. किसान ई मित्र अॅप शेतकऱ्यांचा खूप चांगला मित्र झाला आहे. जिओ फेन्स डेटामुळे पिकांचे नुकसान कळणार आहे. ई मार्केटमुळे शेतमालाच्या बाजारभावाची माहिती मिळणार आहे पर्यायाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे.
काळाच्या गरजेप्रमाणे शेतीत बदल केला तर शेती फायदेशीर ठरणार आहे. आता तंत्रज्ञानाचा वापर फार सोपा झालेला आहे. शेतात साधं मुरघास कसं तयार करायचे म्हटले तर त्याचा व्हिडिओ बघायला मिळतो, तरुण शेतकरी हे करुन त्याचे व्हिडिओ तयार करुन टाकत आहेत. फार्म इन्फ्लुएन्सर हा वर्ग देखील फार महत्वाचा बनला आहे. तंत्राचा वापर येणाऱ्या काळात फार महत्वाचा ठरणार आहे आणि यामध्ये तरुणांचा सहभाग तेवढाच महत्वाचा राहणार आहे. पिकांचे मुल्यवर्धन करुन उच्चतम दर देणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्यात त्यावर प्रक्रिया करण्याच्या खूप संधी आहेत. आपला ब्रॅण्ड डेव्हलप करुन शेतमालाचे मुल्य वाढवता येणार आहे.
एमयाटीचे महासंचालक मुनिश शर्मा म्हणाले की, सध्याच्या इराण- इस्त्रायल युद्धाच्यानिमित्ताने नविन परिभाषा तयार होत आहे. अन्नसुरक्षा, डेटा सेक्युरीटी, एनर्जी असे प्रश्न निर्माण होत आहेत येणाऱ्या काळात या क्षेत्रात संधी आहेत. मास टू क्लास होण्याची वेळ आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने काम करताना ही बाब लक्षात आली की, प्रवेश खूप होतात मात्र त्यातून आऊटकम फार कमी आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे स्टार्टअप, उद्योगासाठी फार संधी आहेत. चार भिंतीच्या बाहेर जाऊन प्रॅक्टिकली शिकण्याच्या संधी आहेत. या धोरणात कौशल्यावर आधारीत आणि प्रॅक्टिकलवर भर राहणार आहे. कृषीआधारीत करिअरच्या येणाऱ्या काळात खूप मोठ्या संधी आहेत. ज्याप्रमाणे वैद्यकीय, नर्सिंग, इंजिनिअरींगच्या शिक्षणामध्ये खासगी गुंतवणूक वाढते त्यातुलनेत कृषीच्या शिक्षणासाठी वाढत नाही. एआय तंत्रज्ञान हा दूसरा मेंदू असेल जो आपल्या मदतीसाठी तत्पर राहणार आहे. एआयला संधीत रुपांतरीत केले पाहिजे.
नॅच्युरल शुगर्सचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, अन्नदाता शेतकरी ऊर्जादाता होण्यासाठी काय करावे लागणार आहे या अनुषंगाने ठोंबरे म्हणाले सध्या इस्त्रायल आणि इराणच्या युद्धामुळे उदभवलेल्या परिस्थीतीने इंधनाचा फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस खनिज इंधनाचे प्रमाण कमी होत आहे यासाठी इंधनाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याची वेळ आली आहे नव्हे तर ही काळाची गरज बनली आहे. आपल्याला पुनःनिर्मित ऊर्जा अर्थात रिन्यूएबल एनर्जीकडे शंभर टक्के वळावे लागणार असून याचा सर्वात मोठा सोर्स शेती आहे.
आज आपण जे पेट्रोल वापरतो त्यात 20 टक्के वाटा शेतीतून मिळणाऱ्या इथेनॅालचा आहे. या शेतीतून आता अन्नदात्याला अन्नदात्याबरोबर ऊर्जादाता बनता येणार आहे. ऊसापासून केवळ साखरच मिळत नाही तर ऊसाच्या भुशापासून २२०० मेगावॅट वीज मिळते. ऊसापासून साखर, इथेनॅाल,भुश्यापासून वीज, बायोसीएनजी मिळते त्यामुळे ऊस आता केवळ शुगरकेन राहिला नाही तर एनर्जी केनमध्ये बदलला आहे. केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे इथेनॅाल निर्मिती वाढली आहे, देशात आपली 2200 कोटी लिटर इथेनॅाल उत्पादनाची क्षमता आहे 1 हजार 55 कोटी लिटरच 20 टक्के मिश्रण होते.
उरलेल्याचे काय करायचे असा प्रश्न आहे यासाठी सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअलच्या वापर करण्याचा विचार झाला पाहिजे. जगात शुन्य टक्के कार्बन देणारं एकच इंधन आहे ते म्हणजे ग्रीन हायड्रोजन आहे आणि ते म्हणजे शेतीतून मिळणार आहे. तरुणांनी शेतीकडे वळावे म्हणजे त्यांनी येवून शेतीच करावी असंही काही नाही तर त्यांना शेतीत उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करुन त्यावर प्रक्रिया उद्योगाच्या युवकांना खूप संधी आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सांगितले की, शेतीतून समृद्धीकडे जाताना सहकारातून समृद्धीकडे गेले पाहिजे. शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर शेतकरी त्याचा आत्मा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत (एमएसपी) मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जाचे नियोजन करायला शिकवले पाहिजे. घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतीच्या उत्पादनातूनच करण्याच्यादृष्टीने अर्थिक नियोजन बॅंकांनी करुन दिले पाहिजे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि हवं तेवढे कर्ज मिळाले पाहिजे. बॅंकांनी शेतकऱ्यांसोबत भागीदारी करुन पतपुरवठा करावा. बिनव्याजी कर्ज द्यावे आणि ही भागीदारी नफा, नुकसान दोन्हीमध्ये असावी असे नाविन्यपूर्ण पाऊल उचलले गेले तर शेतकऱ्यांची आणि शेती स्थिती सुधारु शकते.
शेतकऱ्यांनी खावटी कर्जातून म्हणजे ज्या कर्जाचा आपल्या उत्पन्नवाढीसाठी काही फायदा होणार नाही अशा अनुत्पादक कारणासाठी बॅंकांनीही कर्ज देवू नये आणि शेतकऱ्यांनी घेवू नये.शेतीतील उत्पन्न कमी निघाले तर नुकसान होते यासाठी जोखमीचे विभाजन करुन पिके घ्यावीत. शेती आणि शेतीशी निगडीत क्षेत्रात युवकांना फार मोठ्या संधी असून युवकांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी बॅंकानी पाठबळ द्यावे. युवकांनी ग्रामीण भाग आणि शहरी भागाच्या मध्यावर प्रक्रिया उद्योग सुरु केले तर शेतीतील तरुणांचा सहभागही वाढेल आणि शहराकडे होणारी स्थलांतरे थांबतील.
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ म्हणाले की, शिक्षण आणि संशोधनातूनच समृद्धी येत असते शेती क्षेत्र शिक्षणाशी जोडण्यात आलेले आहे. शेतीमध्ये खूप मोठ्या संधी आहेत. आता शिक्षण खोलात जावून द्यावे घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ वाचून नव्हे तर त्याचा अनुभव घेत शिकावे लागणार आहे यासाठी एक इमरशन प्रोग्राम राबवावा लागेल. शेती हा प्रश्न नसून जागतिकस्तरावरची मोठी संधी बनली आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून शेतीला समृद्धतेकडे नेता येणार आहे. शेतीत उत्पादीत शेतमालाचे मुल्यवर्धन करुन शेतीला समृद्धीकडे घेवून जाणे शक्य होणार आहे.
उद्योजिका ज्योती दाशरथी म्हणाल्या की, समृद्ध शेती, समृद्ध भारत असा आज विचार करावा लागणार आहे. सौरऊर्जेमुळे आता ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर राहिला नाही. शेतमालाचे मुल्यवर्धन करु चांगला व्यवसाय होऊ शकतो. शहरामध्ये आणून त्याचे मुल्यवर्धन करण्यासाठी वाहतुक खर्च वाढणार आहे. हा वाहतुक खर्च कमी करण्यासाठी ग्रामीण भागातच शेतमालावर प्रक्रिया करुन मुल्यवर्धन करावे लागणार आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. ज्यावेळी शेतमाल येतो त्यावेळी भाव पडलेले असतात यासाठी गोदामे उभारण्याची गरज आहे म्हणजे ज्यावेळी चांगला भाव मिळेल त्यावेळी तो विकता येईल याने शेतमालाला चांगला भाव मिळेल. शेतमाल साठवण्यासाठी बॅंकानी पुढाकार घेवून शितगृहे उभारावी.
उद्योजिका निधी पंत यांनी सांगितले की, अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये फार मोठ्या संधी आहेत. ग्राहक आता आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरुक झाला आहे. चोखंदळ ग्राहकांना मुबलक असे प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त काय आहे, त्याचा आरोग्याला फायदा, हानी समजायला लागले आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्यांनी ग्राहकांचा ट्रेन्ड ओळखून उद्योग सुरु करावे, मालाचे उत्पादन करावे. ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार पाहिजे त्यासाठी ते अधिकची किंमतही मोजायला आता तयार झाले आहेत याचा फायदा मुल्यवर्धन करुन शेतमाल विकणाऱ्यांनाही साहजिकच होणार आहे. प्रक्रिया उद्योगाकडे युवकांनी वळले पाहिजे.उत्पादित मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर केला पाहिजे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादने दिल्यास या क्षेत्रात फार चांगल्या संधी आहेत.
पर्ल एंटरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक संजय देशमुख यांनी सांगितले की, आटोमायजेशन म्हणजे आधुनिक शेती नव्हे. आधुनिक शेतीसाठी आपण कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरतो हे अधिक महत्वाचे आहे. वेगवेगळ्या पिकांमध्ये काय बदल होत आहेत, होणार आहेत यासाठी तंत्रज्ञान कोणते देवू शकतो हे ठरवले गेले पाहिजे. अन्य क्षेत्रासाठी प्रशिक्षक दिला जातो तसे शेती करणाऱ्यांसाठीही असले पाहिजे असा वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे.
शेतीमध्ये युवकांचा इंटरेस्ट निर्माण झाला तर ते स्वतः शेती करण्यासाठी पुढे येतील. शेतीतूनही चांगला पैसा मिळतो हे दाखवून दिले गेले पाहिजे. शेतीला बिजनेस म्हणून करा,नोकरीच्या ठिकाणी कसे वेळच्यावेळेला जाता, कामे करता तसे शेतीला नोकरीचे ठिकाण समजून, आॅफीस समजून काम करा शेतीशिवाय पर्याय नाही. प्रत्येक व्यवसायात चढ उतार असतातच पाण्याची उपलब्धता बघून पिक पद्धती बदलली तर यशस्वी शेती होईल. शहरीभागामध्ये टेरेस फार्मिंग केल्यास शहर हिरवी तर होतीलच याशिवाय मुलांमध्ये पिकांची वाढ अनुभवता येईल, त्यांची रुची वाढत जाईल शेतीचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत जाईल. प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास शेतीमध्ये क्रांती शक्य आहे.
आत्माचे संचालक अभयकुमार पडिले यांनी सांगितले की, ग्रामीण भागात कृषी उद्योजकता वाढली पाहिजे. आता तरुण शेतकरी उच्चशिक्षित झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतीत फार मोठे बदल होत आहेत. शेतकरी म्हणजे पिचलेला असे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांच्या यशोगाथा पुढे आल्या पाहिजेत. एआयच्या वाढत्या वापरासाठी तंत्रज्ञाची तर गरज भासणार आहे. जे कुशल तंत्रज्ञ आहेत त्यांनाच संधी मिळणार आहेत यामुळे एआय तंत्रज्ञानाकडे अडचण म्हणून नव्हे तर संधी म्हणून बघितले जावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे आकाशाकडे बघणारा, सुरकुतल्या चेहऱ्याचा शेतकरी असे चित्र बदलले आहे.
युवा शेतकऱ्यांना उत्पादकता वाढत असल्याचे समजले आहे आता त्यांना अर्थिक गणित समजून घ्यावे लागणार आहे. नफा, खर्चाचा ताळेबंद समजून घ्यावा लागणार आहे. शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी अर्थकारण आणि तंत्रज्ञान समजून घ्यावे लागेल. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेचे, सेंद्रीय उत्पादनासाठीचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे आपल्या व्यवसायासाठी जे आवश्यक आहे त्याचे प्रशिक्षण घ्या, जिथे या क्षेत्रातील एक्सपर्ट आहेत तिथे भेट द्या, प्रशिक्षण घ्या. नैसर्गिक उत्पादनाचे लोकांना महत्व कळाले असल्याने शेतीची खूप मोठी बाजारपेठ आहे पर्यायाने खूप मोठ्या संधी आहेत.
परभणी अग्रोटेकचो एम.डी. कुंदन देशमुख यांनी म्हटले की, आधुनिक शेतीमुळे शेतीमधील अनिश्चितता संपून शाश्वत शेती झाली आहे. मोबाईलच्या रुपाने आज प्रत्येकाच्या हातामध्ये एक प्रभावी तंत्रज्ञान आले आहे. त्यावर सर्व माहिती मिळते. शेतीसाठी पूरक इकोसिस्टीम तयार होणे गरजेचे आहे. या क्षेत्रात निर्यातीच्या संधी आहेत. स्टार्टअप सुरु करण्याच्या संधी आहेत. युवापिढीने शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. इतरांशी करार करुन त्यांच्या सहकाऱ्याने मालाची विक्री, निर्यात करावी. आपल्याला जे ज्ञान आहे त्याचा समजुतदारपरणे शेतीसाठी वापर करा. जिथे जोखीम आहे तिथे पैसा आहे म्हणून तरुणांनी या क्षेत्रातही काम करताना रिस्क घेतली पाहिजे.
राजहंस दूधचे एम.डी. रणजित देशमुख यांनी म्हटले की, दूध उत्पादनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकार आहे. शेतीला दूध उत्पादनाचा फार मोठा आधार आहे. यामध्ये अल्पभूधारक, भूमीहिन जोडलेले आहेत. मात्र खंत एका गोष्टीची आहे की, दूग्धोत्पादन उद्योगाकडे अन्य उद्योगांच्या तुलनेत कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. आपण जन्मल्यापासून दुधावरच वाढलेलो आहोत त्यामुळे दुध हा कंम्पलिट डायट आहे. दूग्धजन्य पदार्थांची दिवसेंदिवस वाढत आहे. दूध, पनीर, चीज, बटर, लस्सी, ताक, तूपाची वाढती मागणी असल्याने यात तरुणांना संधीही खूप आहेत.
सर्वांच्या हाताला काम देण्याची आणि ग्रामीण भागातून होणारी स्थलांतरे थांबवण्याची क्षमता या उद्योगात आहे. दूध उत्पादकांनी टाक चारा अन् काढ धारा हे चित्र बदलून दुध उद्योजक बनावे. खर्चाचा ताळमेळ ठेवावा. शेतकऱ्याच्या दारात 50 लिटर दूध देणारी गाय उभी करण्यासाठी मिशन – 50 चा आम्ही संकल्प केला आहे. रोज 50 लिटर दूध देणाऱ्या गायी पंजाबमध्ये आहेत यासाठी पंजाब प्रोग्रेसिव फार्मरसोबत महाराष्ट्र प्रोग्रेसिव डेअरी फार्मने करार केला आहे त्यांच्याकडील ज्ञान घेवून येत्या सात- आठ वर्षात मिशन – 50 हे लक्ष गाठणार आहोत.