मुंबईत आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, भीषण अपघातात मुंबई पालिकेच्या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू
प्रशांत बढे, एबीपी माझा April 25, 2026 12:13 AM

Mumbai Accident News : मुंबईच्या विक्रोळीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये मुंबई महानगर पालिकेच्या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. डॉ. निवास थंगवेलू यादव असं या  31 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. विक्रोळीच्या गांधीनगर जंक्शन इथं अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीवरुन जात असताना त्यांना मागून आयशर टेम्पोने धडक दिली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

टेम्पो चालक गोविंद राजकुमार गिरी याच्यावर गुन्हा दाखल

डॉ. निवास यादव हे मानखुर्द च्या पशुवधगृहात गेले दहा ते बारा वर्षांपासून कर्तव्य करीत होते. गेल्याच वर्षी त्यांचे लग्न झाले होते. आज दुपारी ते त्यांच्या दुचाकीवरून विक्रोळी च्या गांधीनगर जंक्शन वरील पुलावरून जात असताना त्यांना मागून आयशर टेम्पो ने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी टेम्पो चालक गोविंद राजकुमार गिरी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

भंडारा शहरात भीषण अपघात, दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू

भंडारा शहरात अपघाताची (Accident) घटना घडली असून या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. एसटी बसनं दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना भंडारा येथील एसटी डेपो परिसरात घडली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

भंडारा शहरातील एसटी डेपोच्या आवारात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतक हे भंडारा शहरातील चांदणी चौकातील येथील रहिवाशी आहेत. रोहित खेडकर (30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर असं या अपघातात मृत बालकांचं नावं आहे. मृतक रोहित यांचा पाण्याच्या आरो प्लांटचा व्यवसाय असून ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. खाली झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीनं एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीचं मृत्यू झाला.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालय जमा झाले होते. एसटी डेपो परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त एसटी डेपो परिसरात तैनात करण्यात आला आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.