Pune Latest News: पुण्यात मेट्रोचे अवघे दोन मार्ग सुरु झाले आहेत, उर्वरित सर्व मार्ग मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना पुणे महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी मेट्रो सेवा शहराच्या हद्दीच्या बाहेर न्यावी यासाठी उपसूचना देऊन प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. यामध्ये कात्रज ते खेड शिवापूर टोलनाका, खडकवासला ते डोणजे, वाघोली ते लोणीकंद आणि कात्रज ते उंड्री असे मेट्रोच्या विस्तारीकरणाचे चार प्रस्ताव मंजूर केले आहेत. यापैकी किती प्रस्ताव व्यवहार्य ठरणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.
महापालिकेच्या मुख्यसभेच्या कार्यपत्रिकेवर असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. नगरसेविका वर्षा तापकीर यांनी शहर सुधारणा समितीपुढे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत प्रस्तावित करावी हा प्रस्ताव दिला होता. त्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिल्यानंतर तो मुख्यसभेच्या मान्यतेसाठी आला होता. त्यास शुक्रवारी मान्यता देण्यात आली. त्याच सोबत अन्य तीन मेट्रोमार्गाबाबत नगरसेवकांनी उपसूचना देऊन मेट्रोची सेवा शहरापासून लांब किमान २० किलोमीटर पर्यंत पुढे नेली आहे.
स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. सिंहगड, पानशेत या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, शनिवार, रविवारी ही संख्या ३० हजारापर्यंत जाते. याचा विचार करून खडकवासला ते डोणजे चौक इथपर्यंत मेट्रो न्यावी अशी उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काकासाहेब चव्हाण आणि नगरसेविका अनिता इंगळे यांनी दिला होता.
तसेच कात्रज ते हिंजवडी ही मेट्रो कात्रज देहू रोड बाह्यवळण मार्गाने प्रस्तावित केली जाणार आहे. हा मेट्रो मार्ग कात्रजपासून उंड्रीपर्यंत प्रस्तावित करावी अशी दुसरी उपसूचना देण्यात आली. तर रामवाडी ते वाघोली मेट्रोला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा मेट्रो मार्ग लोणीकंद पर्यंत करण्यासाठी राज्य सरकार मंजुरी देईल या भरवशावर महामेट्रोतर्फे याचा डीपीआर तयार करावा, तसेच एमएसआरडीसीकडून उन्नत मार्गही करावा अशी उपसूचना देण्यात आली होती. या तिन्ही उपसूचना मुख्यसभेने एकमताने मान्य केली आहे.