IPL 2026 Live: साई सुदर्शनने शतक झळकावले, RCBच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम! GT ने उभे केले तगडे लक्ष्य
esakal April 25, 2026 01:45 AM

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update: साई सुदर्शनने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शतक झळकावणाऱ्या पाचव्या खेळाडूचा मान पटकावला. तो संजू सॅमसन ( २), अभिषेक शर्मा, क्विंटन डी कॉक व तिलक वर्मा यांच्या पंक्तित दाखल झाला आहे. गुजरात टायटन्सच्या या सलामीवीराने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना ५७ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि शुभमन गिलसह पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. साई व शुभमन यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायवार GT च्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला.

RCB कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. साई -शुभमनजोडीने सुरुवातीला संयमी खेळ करताना पॉवर प्लेमध्ये ५७ धावा जोडल्या आणि यात साईच्या ४६ धावा होत्या. साईने उंच उंच फटके मारणे सुरू ठेवले आणि आयपीएलमध्ये सर्वात कमी ४७ इनिंगमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडताना ख्रिस गेलचा ( ४८) विक्रम मोडला. साई व शुभमन यांच्या १२८ धावांच्या भागीदारीला १३व्या षटकात सुयांश शर्माने ब्रेक लावला. शुभमन ३२ धावांवर झेलबाद झाला. ( RCB vs GT Live: साई सुदर्शनचे विक्रमी शतक! ख्रिस गेलचा सर्वात भारी विक्रम मोडला)

साई-शुभमन यांची ही पाचवी शतकी भागीदारी आहे आणि आयपीएलमध्ये पहिल्या विकेटसाठीही ही संयुक्तपणे दुसरी सर्वाधिक शतकी भागीदारी आहे. या यादीत शिखर धवन व डेव्हिड वॉर्नर हे ओपनर ( ६) अव्वल स्थानी आहेत. साई व शुभमन यांची १२८ धावांची भागीदारी ही गुजरातसाठी RCB विरुद्ध कोणत्याही विकेटसाठी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. साईच्या खेळीला १६ व्या षटकात जोश हेझलवूडने ब्रेक लावला आणि साई ५८ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०० धावांवर बाद झाला. ( IPL 2026 : क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना, युवा खेळाडूला गंभीर दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले... Video)

IPL मध्ये सलग तीन पर्वात शतक झळकावणारा साई हा ख्रिस गेल ( २०११-१३) नंतर दुसराच फलंदाज ठरला. आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावले जाण्याच्या नकोशा विक्रमात RCB ने अव्वल स्थान पटकावले. RCB विरुद्ध १५ शतकं झळकावली गेली आहेत. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स व मुंबई इंडियन्स ( प्रत्येकी १४), CSK, SRH ( प्रत्येकी ११) आणि RR, PBKS ( प्रत्येकी १०) यांचा क्रमांक येतो.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

साईच्या विकेटनंतर गुजरातने १५ व्या षटकानंतर २ बाद १७० धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर RCB च्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. जॉस बटलर १६ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. २० व्या षटकात रसिख दार गोलंदाजीला आला, परंतु दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. कृणाल पांड्याकडे चेंडू सोपवला गेला अन् जेसन होल्डरने पहिलाच चेंडू षटकार खेचला. तिसरा चेंडू टाकताना कृणालच्या पायात क्रॅम्प आल्याने त्याला प्राथमिक उपचार घ्यावे लागले. होल्डरने तिसरा चेंडूही खणखणीत षटकार खेचला. मिस्ड फिल्डमुळे होल्डरला चौकार मिळाला आणि गुजरातने २० षटकांत ३ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारली. होल्डरने १० चेंडूंत २३ धावा चोपल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.