तात्या लांडगे
सोलापूर : संचमान्यतेतील पदांपेक्षा जास्त पदे भरली, संचमान्यता अंतिम झाली नाही आणि एकाच शाळेचे दोन युडायस क्रमांक असलेल्या शाळांमधील शिक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थांबला होता. फेब्रुवारीच्या पगारातून प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) गेला आणि मार्च महिन्याचा पगार न झाल्याने शिक्षकांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संचालकांनी अशा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी व उपसंचालकांना दिले आहेत.
राज्यातील अनेक शाळांमध्ये प्रत्यक्ष संचमान्यतेनुसार मान्य व कार्यरत पदे, यात कार्यरत पदे मंजूर संचमान्यतेतील पदांपेक्षा जास्त आहेत. अशा शाळांच्या बाबतीत वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तपासणी करावी. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून अतिरिक्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील कार्यवाही करायची आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत विभागीय उपसंचालक कार्यवाही करणार आहेत. त्यांनी त्यांच्या लॉगिनमधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्यातील वेतनाची कार्यवाही करायची आहे.
याशिवाय ज्या शाळांच्या बाबतीत एक युडायस क्रमांक दोन शाळांना देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा वेतन पथकाच्या अधीक्षकांनी त्यांच्या लॉगिनमधून करायची आहे. एका युडायस क्रमांकावर दोनशाळांचे ‘डीडीओ’ कोड तयार झाले असल्यास त्यासंदर्भात वेतन पथक अधीक्षकांनी त्यांच्या लॉगिनमधून कार्यवाही करायची आहे, असे संचालकांनी स्पष्ट केले आहे.
एकाच वेतनासाठी हा बदल
शालार्थ प्रणालीत जन्म दिनांक, प्रथम नियुक्ती दिनांक, याबाबत वेतन व भत्ते वितरीत करताना अडचणी येत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी त्यांच्या लॉगिनमधून कार्यवाही करायची आहे. त्याचा एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर करायचा आहे. दरम्यान, वेतन करण्यातील हा बदल मार्च महिन्याच्या पगारापुरताच असणार आहे. यापुढे शालार्थ प्रणालीवरील माहितीवरून तेथूनच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार होईल, असे शिक्षण संचालकांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.