Pune Water Scarcity : पुण्यात अघोषित 'पाणी'बाणी! दुरुस्तीची कामे लांबल्याने पाणीपुरवठा विस्कळित; नागरिकांचा संताप
esakal April 25, 2026 03:45 AM

पुणे - शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना आज (ता. २४) पुणेकरांनी अघोषित पाणी कपातीची रंगीत तालीम अनुभवली. गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पण शुक्रवारी हा पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत न संपल्याने पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

आज पाणी येईल या भरवशावर बसलेल्या नागरिकांना दिवसभर पाणी मिळाले नाही. अनेकांच्या घरात तर सकाळचे विधी उरकण्यासाठी देखील पाणी नव्हते. पिण्यासाठी जार विकत घेण्याची नामुष्की पुणेकरांवर ओढावली. या ‘पाणी’बाणी सदृश स्थितीचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पडसाद उमटले.

महापालिकेकडून देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. २३) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (ता. २४) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी येईल, असे स्पष्ट केले होते. आज ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा दोन ते तीन तास उलटून गेले तरीही पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांना, अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा सुरू केली. अनेकांनी सकाळीच टॅंकर मागविण्याचा प्रयत्न केला; पण अचानक वाढलेल्या मागणीमुळे टॅंकरही उशिरा मिळाले. घरात पाणी नसल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच गैरसोय झाली.

नागरिकांचा संताप

उन्हाळ्यामुळे शहरात आधीच कमी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची तारेवरची कसरत सुरू आहे. गुरुवारी पाणी नसणार हे माहिती असल्याने नागरिकांनी घरात एका दिवसासाठी पाण्याची साठवण केली. सोसायट्यांनी टँकर मागवून टाक्या भरून घेतल्या होत्या. शुक्रवारी पाणीपुरवठा नियोजित वेळेपेक्षा खूप उशिराने किंवा सायंकाळी होईल, अशी पूर्वकल्पना पाणीपुरवठा विभागाने दिलेली नव्हती. त्यामुळे नागरिक पाणीपुरवठा विभागावर विश्वास ठेवून आज पाण्याची वाट बघत बसले. पण पाणी आले तर नाहीच, ते कधी येणार याचेही उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले. याचा सर्व राग नगरसेवक, अन्य राजकीय पुढारी यांच्यावर काढण्यात आला.

वेळापत्रक बिघडले

सकाळी वेळेवर पाणी न आल्याने घरात स्वयंपाक करण्यासाठी देखील पाणी नव्हते. तसेच अंघोळ व अन्य कारणांसाठी पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांचे वेळापत्रक कोलमडून गेले. अनेकांना कार्यालयात जाण्यासाठी उशीर झाला, तर काहींनी आंघोळ न करता कार्यालय गाठले. सोसायट्यांनी टँकर मागवून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण टँकरची प्रचंड मागणी वाढल्याने टँकरसाठी बराच वेळ वाट पाहावी लागत होती. काहींनी ज्यांच्याकडे बोअरवेल आले अशांकडून तात्पुरते पाणी घेऊन कामे उरकली. महिलांसह नोकरदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

कामे संपलीच नाहीत

१) पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील कामे गुरुवारी दिवसभर सुरू होतीच, पण हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. शुक्रवारी दुपारी दोनपर्यंत हे काम सुरू होते.

२) पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर शहरातील सुमारे ७० टक्के पाणीपुरवठा अवलंबून असल्याने संपूर्ण शहरात पाणी नसल्याने भयानक स्थिती निर्माण झाली.

३) दुरुस्तीची कामे वेळेत संपणार नाहीत याची पूर्वकल्पनाही पाणीपुरवठा विभागाने दिली नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

चांदणी चौकात जलवाहिनी फुटली

चांदणी चौकाजवळ लोहिया जैन आयटी पार्कजवळ मेट्रोच्या कामासाठी गुरुवारी खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. गुरुवारी लोकांनी पुरेसा साठा केला होता. मात्र शुक्रवारी कमी दाबाने पाणी येईल अशी खात्री होती. मात्र कोथरूडमधील भुसारी कॉलनी, परमहंसनगर, शास्त्रीनगर आदी भागांत दुपारपर्यंत पाणी नव्हते. काही भागात दुपारी बारानंतर पाणीपुरवठा सुरू झाला. पण चाळ भागात व वस्ती भागात महिलांची पाण्यासाठी तारांबळ उडाली होती.

मागील काही दिवसांपासून वेळी अवेळी पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. चौकशीसाठी अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास कोणताही प्रतिसाद मिळत नाही. यावर तातडीने उपाययोजना करून आम्हाला दिलासा द्यावा.

- सुवर्णा शहाणे, स्थानिक नागरिक

गॅस टंचाईमुळे आधीच अडचणी वाढल्या आहेत. त्यातच पाणीटंचाईमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. गुरुवारी पाणी येणार नाही याची कल्पना होती, आज टँकर मागवावे लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

- सदानंद पुजारी, हॉटेल व्यावसायिक

तुमचे मत मांडा...

देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. मात्र ही कामे कामे वेळेत न संपल्याने शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.