IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained
esakal April 25, 2026 03:45 AM

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या ५ पैकी चार सामन्यांत विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना हार पत्करावी लागली होती, पंरतु आज RCB ने बंगळुरूच्या चाहत्यांचा विजयाने निरोप घेतला. चिन्नास्वामी स्टेडियमवरील हा RCB चा शेवटचा सामना होता. आता उर्वरित ७ सामने हे बंगळुरूबाहेर खेळणार आहेत, परंतु आयपीएलचा इतिहास पाहता प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्या घरच्या मैदानावर ७ सामने खेळते, पण यावेळी RCB च्या चाहत्यांना केवळ पाच सामने का आले?

साई सुदर्शनने ५८ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०० धावांची खेळी करून गुजरातला ३ बाद २०५ धावांपर्यंत पोहोचवले. RCB ला हे लक्ष्य जड जाईल असे वाटले होते, कारण जेकब बेथेल ( १४) स्वस्तात माघारी परतला. पण, विराट कोहली आज भलत्याच मूडमध्ये होता आणि त्याला साथ मिळाली फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कल याची... देवदत्तने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला.

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

दोघांची ११५ धावांची भागीदारी राशिद खानने संपुष्टात आणली. देवदत्त २७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदार ( ८) व जितेश शर्मा ( १०) हे स्वस्तात माघारी परतल्याने सामन्यात रंगत आली होती. पण, टीम डेव्हिड ( १०) व कृणाल पांड्याच्या १२ चेंडूंत नाबाद २३ धावांची संघाला १८.५ षटकांत विजय मिळवून दिला. RCB ने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

RCB चे पुढील दोन होम सामने कुठे?

गतविजेत्या RCB ने मागच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठा सोहळा आयोजित केला होता आणि त्यात स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना जीव गमवावे लागले होते. त्यानंतर या स्टेडियमवर क्रिकेट सामने बंद केले गेले होते. आयपीएल २०२६ मध्ये अगदी अखेरच्या क्षणाला येथे सामने खेळवण्याची परवानगी मिळवली गेली. पण, त्याचवेळी RCB येथे केवळ पाच सामने खेळतील हे स्पष्ट केले गेले होते. त्यामुळे RCB ला होम ग्राऊंड म्हणून रायपूरची निवड करावी लागले. आता RCB चे दोन होम सामने रायपूरच्या Shaheed Veer Narayan Singh International Cricket Stadium वर होतील.

ते सामने केव्हा?
  • १० मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स

  • १३ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स

उर्वरित सामने कुठे?
  • २७ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली

  • ३० एप्रिल - गुजरात टायटन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद

  • ७ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ

  • १७ मे - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, धर्मशाला

  • २२ मे - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.