Uruli Kanchan Accident : अपघातांची मालिका काही थांबेना! चुकीच्या दिशेने वाहन चालवून जेष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
esakal April 25, 2026 03:45 AM

- सुनील जगताप

उरुळी कांचन - उरुळी कांचन येथे अपघातांची मालिका काही थांबेना, चुकीच्या दिशेने वाहन चालवून जेष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल. पुणे-सोलापूर महामार्गावर नियम धाब्यावर बसवून उलट दिशेने आलेल्या टेम्पोने पाठीमागून दिलेल्या धडकेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तळवाडी चौकात घडली. अर्जुन गंगाराम बोराटे (वय ७५, रा. तळवडी चौक, हरीजीवन हॉस्पिटल समोर, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार सुनील बोराटे (वय -३१, रा. उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार अमोल सोमेश्वर गवई या टेम्पो चालकावर (वय-३० वर्ष, रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार बोराटे यांचे तळवाडी चौकात 'सावता माळी स्नॅक्स' नावाचे हॉटेल आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे आजोबा अर्जुन बोराटे हे हायवेच्या कडेने शिंदवणे चौकाकडून सदानंद स्वीटकडे पायी चालत जात होते.

त्याचवेळी पुणे बाजूकडून महामार्गावर चुकीच्या दिशेने अशोक लेलँडचा 'दोस्त'टेम्पो (क्र.एमएच १२ व्हीटी ३४०७) गाडीचा चालक अमोल गवई याने आपले वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून,पायी चालणाऱ्या बोराटे यांना पाठीमागून डाव्या बाजूने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अर्जुन बोराटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या नाक, कान व तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.

दरम्यान, अपघातानंतर फिर्यादी तुषार बोराटे,दत्तात्रय कांचन आणि खुद्द वाहन चालकाने जखमी बोराटे यांना तात्काळ उरुळी कांचन येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असताना शुक्रवारी (दि. २४) दुपारी त्यांचे निधन झाले. तुषार बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी चालक अमोल गवई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कमलेश होले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.