Summer Yoga Tips : नैसर्गिकरीत्या शरीर ठेवा कूल! उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यासाठी रोज करा 'ही' योगासने; जाणून घ्या पद्धत
esakal April 25, 2026 04:45 PM

-प्रकाश सनपूरकर

सोलापूर : वाढत्या उन्हामध्ये शरीर शीतल ठेवण्यासाठी प्राणायामातील काही प्रकार अत्यंत उपयुक्त ठरतात. सकाळी व संध्याकाळी हे प्राणायाम केल्यास शरीराला नैसर्गिक थंडावा (Summer Yoga) मिळू शकतो.

सध्या शहराचा पारा ४० अंशांपेक्षा अधिक राहात आहे. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आवश्यक झाले आहे. योगशास्त्रात शरीराला नैसर्गिकरीत्या शीतलता देणारे काही प्राणायाम प्रकार विशेष प्रभावी मानले जातात. उष्णतेचा त्रास कमी करून शरीराला आराम देण्यासाठी हे प्राणायाम दिलासादायक ठरतात.

हे प्राणायाम वज्रासन, सिद्धासन, पद्मासन किंवा सुखासनात बसून सहज करता येतात. सकाळी आणि सायंकाळी किमान ३० आवर्तने केल्यास अधिक लाभ मिळू शकतो.

Summer Exercise Tips : उन्हाळ्यात घाम गाळल्याने खरंच वजन कमी होतं का? 'या' 5 चुका टाळा, अन्यथा ओढवू शकतं गंभीर आरोग्य संकट! प्राणायामांची कृती अन् त्यांचे फायदे

चंद्रभेदी प्राणायाम : या क्रियेत उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करावी आणि डाव्या नाकपुडीने खोल श्वास घ्यावा. थोडा वेळ श्वास रोखून धरल्यानंतर (कुंभक), तो श्वास उजव्या नाकपुडीने सावकाश सोडून द्यावा. डावी नाकपुडी ही चंद्रनाडीचे प्रतीक असून ती शरीराला थंडावा देते.

शीतली प्राणायाम : जीभ बाहेर काढून तिची नळीसारखी घडी घालावी. या नळीतून जोरात श्वास आत घ्यावा. त्यानंतर तोंड बंद करून श्वास हळूहळू नाकावाटे बाहेर सोडावा. यामुळे जिभेला आणि पर्यायाने संपूर्ण शरीराला त्वरित थंडावा जाणवतो.

Bitter Gourd Benefits : मधुमेहावर रामबाण, पण अतिसेवन ठरू शकतं घातक; 'कारले' खाण्यापूर्वी या गोष्टी नक्की वाचा!

शीतकरी प्राणायाम : वरचे आणि खालचे दात एकमेकांवर घट्ट मिटून घ्यावेत. ओठ उघडे ठेवून दातांच्या फटीतून ‘सी-सी’ असा आवाज करत श्वास आत ओढावा. त्यानंतर तोंड बंद करून श्वास नाकावाटे बाहेर सोडावा.

उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे थकवा आणणारे व्यायाम केले जात नाहीत. मात्र, विशिष्ट प्राणायामाचे प्रकार उष्णता कमी करू शकतात. त्यामुळे या योगक्रिया पूर्ण उन्हाळ्यातही उत्साह आणणाऱ्या ठरतात.

-विशाल शहा, योगशिक्षक, सोलापूर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.