Mumbai Goa Highway Toll : मुंबई -गोवा महामार्गावर कामे अपूर्ण, टोल वसुलीची तयारी; पर्यायी रस्त्यांमुळे अपघाताचे धोके, वाहन चालकांचा संताप
esakal April 25, 2026 04:45 PM

Mumbai Goa highway accident risk : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बाजारपेठ परिसरात चौपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महत्त्वाची कामे वर्षभर पूर्ण होण्याची चिन्हे नसताना, टोल नाके सुरू करण्याच्या हालचाली वाढल्याने काम अपूर्ण, अन् टोलची वसुली, अशी विसंगती पाहायला मिळते. यावर वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एक मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एप्रिल महिना संपत आला तरी हे काम पूर्ण झालेले नाही. संगमेश्वर परिसरातील एकूण कामाचा वेग पाहता, हे काम पूर्ण होण्यास अजून किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या अक्षम्य दिरंगाईमुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात ही चिंतेची बाब बनली आहे.

चौपदरीकरण सुरू असताना पर्यायी रस्ते (डायव्हर्जन) खडीकरणाऐवजी केवळ मातीचे बनविण्यात आले आहेत. कडक उन्हामुळे या मातीची धूळ होऊन वाहनचालकांना समोरचे दिसत नाही, तर थोडेही पाणी पडल्यास हे रस्ते निसरडे होऊन वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी सेवारस्तेच अस्तित्वातच नाहीत आणि जिथे आहेत तिथे मातीचे ढिगारे असल्याने पावसाळ्यात संगमेश्वरचीपरिस्थिती अत्यंत बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Mumbai Goa Highway toll naka: मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली होणार! केंद्र सरकारकडून टेंडर काढून ठेकेदार निश्चितीची तयारी

महामार्गाचे काम सुरू असताना पर्यायी रस्ते (डायव्हर्जन) मातीचे असणे हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आणि धोकादायक आहे. कोकणासारख्या अतिवृष्टीच्या भागात मातीचे रस्ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरतात.

- सचिन जोयशी, संगमेश्वर

सुरक्षा उपायांचा अभाव

महामार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव असून संरक्षक भिंतींचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. संगमेश्वरते माभळे दरम्यान प्रचंड खोदकाम केल्याने गावकरी आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा फवाराही मारला जात नसल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.