Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी परिसरात पती-पत्नीतील वादातून 22 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पवन ज्ञानेश्वर भुते वय 22 असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन याचे लग्न सुमारे सहा महिन्यांपूर्वी झाले होते. घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. या वादातून मानसिक तणाव वाढल्याने पवनने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेच्या वेळी शेजारी राहणाऱ्या भावाने खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी धाव घेऊन आतून बंद असलेला दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.