Israels attack : इस्त्रायलने युद्धविराम तोडला; भीषण हल्ल्यात अख्खं शहरच उद्ध्वस्त, युद्ध पुन्हा सुरू होणार?
Tv9 Marathi April 26, 2026 12:45 AM

इस्त्रायलकडून 28 फेब्रुवारी रोजी इराणवर पहिला हल्ला करण्यात आला आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं, अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि जगाने सुटकेचा निश्वास सोडला. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, मात्र युद्धविरामाचा कालावधी संपताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली. दरम्यान सध्या अमेरिका आणि इराणमध्ये शंती वार्ता संबंधित बोलणं सुरू आहे. ही या चर्चेची दुसरी फेरी आहे.

मात्र एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इस्त्रायलकडून पुन्हा एकदा युद्धविराम तोडण्यात आला आहे, त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जेव्हा अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धविराम झाला होता, तेव्हा इस्त्रायल लेबनॉनवर देखील हल्ला करणार नाही, असं ठरलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायलकडून लेबनॉनवर हल्ला करण्यात आला, त्यामुळे इराण चांगलंच नाराज झालं होतं. शेवटी सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये देखील युद्धविराम घडून आला होता, डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली होती.

मात्र त्यानंतर आता इस्त्रायलने पुन्हा एकदा युद्धविराम तोडला आहे. इस्त्रायलकडून दक्षिण लेबनॉनवर पुन्हा एकदा हल्ले करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये असलेल्या बिंत जुबैल या शहरावर भीषण हल्ले केले आहेत. इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये हे अख्ख शहरच पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. अल जजीराच्या एका रिपोर्टनुसार इस्त्रायलने बिंत जुबैल शहरातील अनेक इमारतींवर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये लेबनॉनचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्त्रायलने अनेक इमारती उडवल्या आहेत. याबाबत लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांकडून देखील माहिती देण्यात आली आहे, लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.