नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते की, ‘छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा.’ यावर आता मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आता यांना झोडावचं लागणार आहे…धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावर बोलताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटले की,’शिवरायांचा अपमान भाजप सरकारच घडवून आणतंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एखाद्या वेळेस आता यांना फटकावलं पण पाहिजे, आता फक्त कमेंट करून, निषेध करून आणि सोशल मीडियावरच बोलून चालणार नाही. आता हे झोडावेच लागणार आहेत मग आता शांत बसून नाही चालणार.’
फटके दिले तरच अपमान थांबेल…पुढे बोलताना जरांगे पाटलांनी, ‘छत्रपतींचा जर हे अवमान करत असतील तर झोडावंच लागेल. केस होईला याला कधीपर्यंत भ्यायचं? भाजप सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे लोकं थांबवले नाहीत तर एकदा झोडाझोडी होणारच आहे. गुन्हा दाखल करून काहीच होणार नाही, यांना फटके दिले तरच हे थांबणार आहेत, यांना दुसरा पर्यायच नाही. मग काही दिवस आंदोलन थांबवावं लागलं तरी चालेल. आता किती दिवस म्हणणार जाहिर निषेध, यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे कधीपर्यंत म्हणणार?’ असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेचा इतिहासात उल्लेख नाही असं विधान केलं आहे.