सातारा - विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांपैकी एक- दोन जागा सातारा जिल्ह्याच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, शेखर गोरे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे पुढे येत असून, शिंदेंच्या शिवसेनेकडून संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून शशिकांत शिंदे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
विधान परिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ मे रोजी मतदानाची तारीख जाहीर केली आहे. या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या जागा विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांकडून) निवडून दिल्या जाणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीच्या उमेदवारांना निवडणूक सोपी होण्यासाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्ह्यातील काही नेत्यांना विधान परिषदेवर घेऊ, असा शब्द दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपकडून सर्वाधिक इच्छुक आहेत. रिक्त झालेल्या नऊ जागांंपैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला, तर दोन जागा शिंदेंच्या शिवसेनेला, एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, तर एक जागा महाविकास आघाडीला सोडली जाणार आहे.
भाजपमध्ये इच्छुक अधिक
भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागेपैकी एक जागा जिल्ह्याला सोडण्याची आशा प्रमुख कार्यकर्त्यांना आहे. सध्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले व आमदार मनोज घोरपडे या भाजपच्या नेत्यांकडून एका जागेची मागणी होऊ शकते. विधानसभेच्या निवडणुकीत काहींना भाजपच्या नेत्यांनी शब्दही दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेखर गोरे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेनेकडून संजीवराजेंना संधी
शिंदेंच्या शिवसेनेची जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून ताकद आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने १५ सदस्य निवडून आणले आहेत. त्यांच्या पक्षाची ताकद वाढत आहे. फलटणमधील राजेगट शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळू शकते. त्यासाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व स्वत: संजीवराजे प्रयत्नशील आहेत. फलटणमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संजीवराजेंना संधी दिली जाऊ शकते.
मकरंद पाटलांकडे मोहितेंची फिल्डिंग
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आलेली आहे. त्यावर कोणाला संधी दिली जाणार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ठरविणार आहेत. सध्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे; पण सुनेत्रा पवार यांच्याकडून कोणाला संधी दिली जाणार याचीही जिल्ह्यात उत्सुकता आहे.
शशिकांत शिंदेही संधीच्या प्रतीक्षेत
महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा असून, ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना सोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार शशिकांत शिंदे हेही इच्छुक आहेत.