पुणे : श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील अंगद-टिला येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि श्री सद्गुरू ग्रुप, पुणे यांच्यावतीने स्वरसंवादिनी प्रस्तुत ‘संपूर्ण गीतरामायण’ हा त्रिदिवसीय भक्तिसंगीत सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. अयोध्येच्या पवित्र भूमीत प्रथमच अशा स्वरूपात ‘गीतरामायण’ सादर होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या सोहळ्यात गायक प्रणव कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी तसेच गायक आनंद माडगुळकर यांनी सादरीकरण केले. ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायणमधील प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण जीवनपटावर आधारित सर्व ५६ गीतांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यासचे महासचिव चंपतराय, विश्व हिंदू परिषदेचे पंकज आणि धनंजय पाठक यांच्या हस्ते झाले. दुसऱ्या सत्रात विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि महंत जगद्गुरू कष्पात्री महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
तिसऱ्या दिवशी सांगता सोहळा अयोध्याचे महापौर गिरीशपति त्रिपाठी यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी आध्यात्मिक गुरू आणि आयुर्वेदतज्ज्ञ श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या पत्नी डॉ. वीणा तांबे यांच्यासह विविध मठांचे संत, महंत, धर्माचार्य आणि देशभरातून आलेले रामभक्त उपस्थित होते. अपर्णा कुलकर्णी, पूजा महामुनी आणि मंदार लिमये तसेच वाद्यसंगतीत श्रीधर मोडक (सिंथेसायझर), वैभव केसकर (तबला) आणि निषाद शिधये (तालवाद्य) यांनी साथ दिली. सोहळ्याचे नियोजन व समन्वय श्री सद्गुरू ग्रुप, पुणेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्यात महंत सीतारामदास महाराज, ज्ञानी चरणजितसिंह (ब्रह्मकुंड गुरुद्वारा), महंत रामललित दास महाराज, महंत बालकदास महाराज, महंत मुकेशकुमारजी महाराज (रावत मंदिर), ब्रह्मकुमारी संस्था, महंत वरूणदासजी महाराज, महंत नागेंद्रदासजी महाराज, महंत डॉ. नारायणचारी, बद्रीविशाल आश्रम, महंत श्रीपालदास महाराज, तसेच अयोध्या येथील रघुवीर संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. के. हरिसिंह आदी उपस्थित होते.
चंपतराय यांच्या हस्ते कुलकर्णी आणि माडगूळकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव केला. तसेच सर्व गायक, वादक आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.