पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो मार्ग निगडीपर्यंत विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी मोरवाडी ते भक्ती-शक्ती चौक निगडीपर्यंत पुणे-मुंबई महामार्ग सेवारस्त्यावर खांब उभारण्यासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. त्याचे डांबरीकरण केल्याशिवाय महापालिकेकडून निधी मिळणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.
पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रो विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यावर अगोदर तीन स्थानके मंजूर होती. त्यात आता निगडी टिळक चौक स्थानकाची भर पडली आहे. विस्तारित मार्गासाठी पिलर उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. सेगमेंट टाकणे व लोहमार्ग टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
मात्र, या कामांमुळे निगडीतील भक्ती शक्ती चौकापासून चिंचवड स्टेशन येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंत (एम्पायर इस्टेट) सेवा रस्त्यावर बॅरिकेड्स लावले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून, सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर खचले आहेत. त्यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे. तो दुरुस्त केल्याशिवाय मेट्रोला महापालिका हिस्सा असलेला निधी देणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सभेने घेतली आहे.
दृष्टिक्षेपात मेट्रो मार्ग (पिंपरी ते निगडी)
लांबी - ४.४१३ किलोमीटर
एकूण स्थानके - ४
कोणती स्थानके : चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, भक्ती-शक्ती
निगडी-मोरवाडी मार्गाची दुरवस्था अन् कोंडी
निगडी ते मोरवाडी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने सेवारस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत. यामुळे सेवारस्ता अरुंद झाला आहे. आधीच सेवारस्ता अरुंद, त्यात त्यावर खड्डे व एवढे कमी म्हणून की काय? या मार्गावरच ठिकठिकाणी वाहने उभी असतात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
सद्यःस्थिती
दुर्गानगर चौकाकडून आल्यानंतर निगडीतील लोकमान्य टिळक चौकातून आकुर्डीकडे वळण घेताना या वळणावर रिक्षा उभ्या असल्याने वाहतुकीस अडथळा
आकुर्डी, काळभोरनगर, चिंचवडमध्ये सेवारस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे
ग्रेडसेपरेटरमध्ये जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी असलेल्या ‘मर्ज-इन’ व ‘मर्ज-आउट’च्या ठिकाणी ना सफेद पट्टे, ना सूचना फलक
सेवा रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर
मोठ्या प्रमाणात उडणारी धूळ
लोकमान्य टिळक चौकातील राडारोड्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास
सायंकाळी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी
मेट्रोच्या कामामुळे सेवारस्ता अरुंद झाला असून, अत्यंत खराब आहे. खड्डे व मोठ्या प्रमाणात धूळ असल्याने या मार्गावरून जाताना कसरत करावी लागते. वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. येथील काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता प्रशस्त करावा.
- ज्ञानेश्वर बहिरे, निगडी