नाशिक : ‘‘ नद्या परस्परांना जोडून महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळाचे संकट दूर केले जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त जलसंपदा विभागामार्फत शनिवारी (ता.२५) ‘गोदा ते नर्मदा’ या जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे प्रारंभ करण्यात आला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधीश गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘अहिल्यादेवींनी नद्यांचे महत्व जाणून प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासींना मुख्य धारेत आणण्याचे कार्य केले. त्यांचे विचार आजही महत्वाचे आणि मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवींसारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ, बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. विखे पाटील यांनी सांगितले, की त्र्यंबकेश्वर, चौंडी येथून सुरू झालेल्या जलयात्रांचा समारोप मध्य प्रदेशातील महेश्वर येथे होणार आहे. राज्यातील ३० नदी खोऱ्यांतील पाणी कलशांद्वारे नर्मदेला अर्पण करण्यात येणार आहे.
इंदूर संस्थानचे युवराज होळकर यांनी अहिल्यादेवींची जन्मभूमी ते कर्मभूमी जलयात्रेचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. अहिल्यादेवींनी सुरू केलेली फड पद्धती उपयुक्त असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. अण्णासाहेब मोरे म्हणाले, की संस्कृती, संस्कार केले तर देश बलशाली आणि विकसित होईल. त्यांच्या हस्ते कुशावर्तातील जलकलश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.
‘अहिल्यादेवींनी उभारलेल्या घाट-बारवांचे संवर्धन’
फडणवीस म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जलसंधारण, जलसंवर्धन आणि समाजकल्याण यांचा समतोल साधला. त्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून जलव्यवस्थापनावर भर दिला. देशभर घाट, बारव, विहिरींची निर्मिती करताना त्यांनी आध्यात्मिकता अन् उपयुक्ततेचा समन्वय साधला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून, त्यांचे संवर्धन राज्य शासन करेल. त्यांचा वारसा पुढे नेत राज्य सरकार जलव्यवस्थापनावर भर देत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत चौंडीतूनही प्रारंभ
अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या यात्रेचा प्रारंभ करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की श्री क्षेत्र चौंडी हे मराठी संस्कृतीचे माहेरघर आहे. ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे, तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल.