पुणे - शहरातील लक्ष्मी रस्त्यावरील एका नामांकित सराफाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कामगारासह त्याच्या तीन साथीदारांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५.२४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात प्रशांत कांतिलाल बर्मेचा (वय ६१, रा. शांतिनगर सोसायटी, कोंढवा), रमाकांत महादेव पराळे (वय ६२) आणि मधू उर्फ महेश्वरी रमाकांत पराळे (वय २२, दोघेही रा. केडगाव, अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सराफाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मार्च महिन्यात या सराफाने कंपनीचे वार्षिक लेखापरीक्षण आणि शिल्लक दागिन्यांची तपासणी केली असता १८ कोटी रूपयांच्या किंमतीचे १२ किलो ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७२ लाख रुपये रोख रकमेचा तुटवडा आढळून आला. चौकशीदरम्यान दुकानात काम करणारा प्रशांत बर्मेचा याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एका महिलेला देऊन अफरातफर केल्याचे उघड झाले.
खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने हे या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना आरोपी हा केडगाव (जि. अहिल्यानगर) येथे लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून मुख्य आरोपी प्रशांत बर्मेचा याला ताब्यात घेतले. तो गेल्या दीड महिन्यांपासून त्याचे दोन साथीदार रमाकांत परळे याच्या घरी राहत होता.
त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना ३ किलो ५५२ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ३.९० कोटी), १.३० कोटी रुपयांची मर्सिडीज कार, ३.३० लाख रुपयांचा मोबाईल फोन आणि ८० हजार रुपये रोख असा एकूण ५.२४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.