निमित्त – महाराष्ट्राचे लोकसंचित
Marathi April 26, 2026 12:25 PM

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा मराठी जनतेच्या अस्मितेचा हुंकार. आपले मतभेद विसरून संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात विचारवंतांबरोबर शाहीरही सहभागी झाले होते. किंबहुना सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचे महत्त्वाचे काम शाहिरांच्या पोवाडय़ांनी केले. हे शाहीर या लढय़ातील बिनीचे शिलेदार होते.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे जिथे सारे पक्ष एकत्र आले. शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर या शाहिरांनी साम्यवादी तत्त्वज्ञान शाहिरीद्वारे रुजवितानाच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उडी घेतली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा मराठी जनतेच्या अस्मितेचा हुंकार ठरत सर्वजण आपले मतभेद विसरून सत्ताधाऱयांच्या विरोधात एकजुटीने लढले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात विचारवंतांबरोबर शाहीरही सहभागी झाले होते. किंबहुना सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचं महत्त्वाचे काम शाहिरांच्या पोवाडय़ांनी केले. हे शाहीर केवळ शाहीर नव्हते, तर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक स्थितीचे भाष्यकारही होते. ते या लढय़ातील बिनीचे शिलेदार होते.
कॉ. डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड यांसारख्या नेत्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात शाहिरांनी जागल्याची भूमिका पार पाडली. ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ अशी डरकाळी फोडणाऱ्या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तेवत ठेवला. पोवाडय़ांच्या, लोकगीतांच्या जोडीला अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशीर, माझी मुंबई, शेटजीचे इलेक्शन असे कितीतरी तमाशे त्याकाळात गाजत होते.
जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना
गाऊ उंचावूनी माना घेऊ तानावर ताना
यांसारख्या कवनांनी सभेतील वातावरणच बदलून जाई. अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमरशेख यांच्यावर साम्यवादाचा विलक्षण पगडा होता. अमरशेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकरांचे अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. आजही महाराष्ट्र-कर्नाटकची सीमा धुमसते आहे.
मूळात संयुक्त महाराष्ट्राचे रान पेटविणारे अमरशेख, अण्णाभाऊ आणि गवाणकर ही त्रिमूर्ती आजच्या तरूण पिढीला किती माहीत आहे? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा लेख कोणत्या अभ्यासक्रमात आहे? असा सवाल विचारला जाऊ शकतो. अमरशेख, अण्णाभाऊ आणि गवाणकर यांनी वीज आणि माईकशिवाय लाखालाखांच्या सभा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ग्रामीण भागात आणि शहरी भागात गाजविल्या.
‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ हे गीत नव्हे, तर साक्षात शब्दांचे निखारे अमरशेख यांच्या तोंडून निघायचे. संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ लिहिला आत्माराम पाटलांनी आणि फार मोठय़ा ताकदीने गायला अमरशेख व अण्णाभाऊ साठेंनी. दिल्लीच्या तख्ताला धडक देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमरशेखांनी ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ अशी डरकाळी फोडली.
‘जग बदल घालूनी घाव, मला सांगून गेले भीमराव’ असे म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वसामान्यांच्या जीवनसंघर्षाची चूड पेटविणारा हा जनसामन्यांमधील असामान्य प्रतिभावंत. ज्याने जगणे, जगण्यामागच्या वेदना आणि जगण्यामागचे तत्त्वज्ञान शब्दबद्ध केलं. ज्यानं विश्वरूपी गणाला सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आवाहन केलं. लोककलेच्या क्षेत्रातील तमाशा आणि त्यातील गण, गवळण, बतावणी आदी लोकशैलींची मोडणी करून त्यात नव्या युगाचा आशय भरला. असा युगप्रवर्तक शाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे!
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ, अमरशेख, गवाणकर या तिघांप्रमाणेच शाहीर आत्माराम पाटील, शाहीर लीलाधर हेगडे, वसंत बापट, जंगम स्वामी यांचेही कार्य मोलाचे होते. त्याकाळातील नेते आणि शाहीर यांच्या अंगात जणू संयुक्त महाराष्ट्राचे वारे संचारलेले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या पोवाडय़ांची निर्मिती ही त्या काळातील लोकसाहित्य शारदेच्या मंदिरातील मोठी उपलब्धी. पोवाडा हा प्रांगणीय लोककला प्रकार असून वीरश्रीयुक्त कीर्तिगान म्हणजे पोवाडा होय. पोवाडा ही अतिशय नाटय़ापूर्ण कथन परंपरा असून त्यात पोवाडा सादर करणारा शाहीर हा श्रोत्यांना त्या पोवाडय़ाच्या प्रसंगांमध्ये कळत-नकळत सामील करून घेत असतो. तो केवळ सादरीकरण करत नाही तर त्याच्या सादरीकरणाचे स्वरूप हे वक्ता-श्रोता संवादाचे असते.

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.