Bhima River Water issue: भीमा नदी पाणीप्रश्नी काँग्रेस-भाजप आमने-सामने; श्रेयवादात प्रणिती शिंदेंनी मारली बाजी!
esakal April 26, 2026 01:45 PM

-राजकुमार शहा

मोहोळ: मोहोळ तालुक्यासह अन्य भागातून वाहत जाणाऱ्या भीमा नदीला पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून, यात अखेर कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चालू वर्षाचा उन्हाळा अत्यंत कडक असून तापमानाचा पारा 43 अंशाच्या वर गेला आहे. भीमा नदी काठच्या व परिसरातील नागरिकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भीमा नदीत उजनी धरणातून पाणी सोडावे अशी लेखी मागणी केली होती.

मागणी बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाण्याचा प्रश्न, पाण्याअभावी जळून चाललेली पिके याचे विदारक चित्र मांडले होते. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही खासदार शिंदे यांनी संपर्क करून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली होती. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

दरम्यान इकडे भीमा नदीत पाणी सोडण्याचे श्रेय खासदार शिंदे यांना जातेय हि बाब लक्षात आल्यानंतर त्यात राजकारण सुरू झाले. कुरुल गटाचे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनीही "इसाळ" म्हणून पालकमंत्री गोरे यांच्याशी संपर्क साधून, भीमा नदीला पाणी सोडण्याची मागणी केल्याची चर्चा सुरू झाली. जाधव हे पालकमंत्र्याशी चार चाकीत बसून प्रवासा दरम्यान पाण्या संदर्भात चर्चा करीत असल्याचे रील समाज माध्यमावर वायरल झाले.

तर पाण्याच्या मागणी संदर्भातील खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले लेखी पत्र ही व्हायरल झाले. खासदार शिंदे यांच्या पाणी सोडण्याच्या मागणीत सामाजिक तथ्य आहे, तर जाधव यांच्या मागणीमध्ये त्यांच्या कारखान्या साठी पुढील वर्षी गाळपास येणाऱ्या ऊस वाचावा हा व्यवसायिक स्वार्थ असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी यापूर्वी केला आहे. काय का असेना पाणी सुटले,शेतकऱ्यांची सोय झाली, मात्र पाणी सोडण्याच्या श्रेयवादाच्या लढाईत खासदार शिंदे यांनी बाजी मारल्याची चर्चा शेतकरी वर्गात व सामान्य जनतेत सुरु आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.