Kolhapur Crime News: तरुणांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनत असताना याच हतबलतेचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. फेसबुकवरील एका जाहिरातीला भुलून महाड (Mahad) येथील एका कुटुंबाला कोल्हापुरात (Kolhapur) येऊन मनस्ताप सहन करावा लागला. अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली या कुटुंबाकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
महाड येथील एका तरुणाने फेसबुकवरील '90 कुळी मराठा वधू वर' नावाच्या पेजवर लग्नासंदर्भात जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्याने संपर्क साधला असता, पूनम पाटील नावाच्या महिलेशी त्याचे बोलणे झाले. संबंधित महिलेने एका अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले. या प्रक्रियेसाठी अनाथ आश्रमाच्या प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरुवातीला 6,500 रुपये आणि लग्नाची तारीख ठरल्यानंतर 7,000 रुपये असे ऑनलाइन पद्धतीने उकळले.
विशेष म्हणजे, पैसे घेऊनही संबंधित तरुणाला मुलीचा फोटो दाखवण्यात आला नाही किंवा तिच्याशी बोलू दिले गेले नाही. तरीही विवाहाच्या आशेने महाडचे हे कुटुंब लग्नाच्या पूर्ण तयारीने कोल्हापुरात दाखल झाले. मात्र, कोल्हापुरात आल्यानंतर ज्या महिलेशी बोलणे झाले होते, तिचा फोन बंद येऊ लागला.
कुटुंबाने कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील अनाथ आश्रमात जाऊन चौकशी केली असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. या आश्रमाच्या नावाने अशा अनेक तक्रारी आधीच प्राप्त झाल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाडच्या या कुटुंबाने तातडीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरील वधू-वर सूचक मंडळांची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या