Marathi Book Review : कर्तृत्ववान 'ती'ची पृथ्वीमोलाची गोष्ट
esakal April 26, 2026 12:45 PM

डॉ. अनघा केसकर - saptarang@esakal.com

निलू निरंजना यांचे मृणालिनी चितळे यांनी लिहिलेले ‘निलू निरंजना : गोष्ट हिची पृथ्वीमोलाची’ हे चरित्र म्हणजे केवळ घटनाक्रमाच्या आधारे लिहिलेले पुस्तक नाही. ओघवत्या शैलीत केलेले हे लेखन म्हणजे एका कर्तृत्ववान व्यक्तीची यशोगाथा आहे.

पहिल्या प्रकरणात निलू यांनी नोकरीत भूषवलेली अत्त्युच्च पदे, त्यांनी बदललेली एक्याऐंशी घरे, त्यांच्यावर अकारण झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यातून पुन्हा त्यांचे जिद्दीने उभे राहणे या गोष्टी आहेत. स्पेस शटल प्रोग्राम, पाण्याखाली बोगदे बांधायचे काम, अणुऊर्जा प्रकल्प अशा कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या ‘असाइनमेंट्स’ निलू यांनी जगभरातील अनेक देशात जाऊन कशा केल्या, हे समर्पकपणे मांडण्यात आल्या आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी निलू लाम्पोक गावी असताना रोपवाटिकांमुळे सुशोभित दिसणारं हे फुलांचं गाव दोन वर्षात कसं वसलं आणि नंतर कसं ओसाड झालं ही कहाणी लेखिकेने नेमक्या शब्दांत चित्रित केली आहे.

‘कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग’ सारख्या क्षेत्रात वावरताना अतिशय जोखमीची कामे निलू यांनी पार पाडली. मात्र, या प्रवासात त्यांना पुरुषी अहंकाराचेही अनेक अनुभव आले. अशा प्रसंगी कधी विनोदाची झालर लावत, तर कधी शिस्तीचा बडगा दाखवत त्या प्रत्येकाशी जुळवून घेत निलू यांनी काम केले.

Premium|Pune book lovers story : पुण्यातील वाचनवेडा प्रवास; आठ मिनिटांत ‘गरमागरम’ पुस्तकं, रद्दीपासून सोळंकी बुकसेलर्सपर्यंतची जादुई भेट

चोरी करण्यासाठी कृष्णवर्णीय तरुणाने निलूवर केलेला हल्ला आणि त्याही वेळी असलेली त्यांची समतोल वृत्ती, हल्लेखोराविषयीची अनुकंपा, स्वतःच्या मोडतोड झालेल्या शरीराकडे त्रयस्थपणे पाहण्याची वृत्ती आणि नंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढची पाच वर्षे सोसलेल्या यातना हे पर्व वाचताना वाचक थक्क होतो.

निलू यांनी भारतात मुक्काम ठोकून ‘पंचम’च्या स्मरणार्थ चित्रपटनिर्मितीसाठी दिलेली आयुष्यातली तीन वर्षे, त्यात आलेले कष्टदायी अनुभव आणि त्याच अनुषंगाने केलेला ज्योतिषशास्त्राचा, टॅरो कार्ड्सचा अभ्यास यातून हाती घेतलेल्या प्रत्येक क्षेत्राचा त्यांनी किती खोलवर जाऊन विचार केला आहे, हे लक्षात येते. एन्रॉन प्रकल्पात निलूची झालेली नियुक्ती आणि छोट्याशा कालावधीत कोकणातील लोकांसाठी केलेलं काम, मुंबईत ढगफुटीच्या प्रलयातून हिंमतीने स्वतःला वाचवलेल्या निलू यांनी लगेच अमेरिकेत जाऊन केलेलं कार्य, कटरिना वादळामुळे उजाड झालेल्या मीसिसिपी राज्यातील कृष्णवर्णीय लोकांच्या पुनर्वसनासाठी केलेले काम... हे सर्व वाचूनही आपण थक्क होतो.

निलू यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी असलेले मैत्रीपूर्ण नाते पाहताना वाचक म्हणून आपले कुतूहल आणखी वाढते. त्या व्यक्तींमध्ये वसंत देसाई, मंगेश देसाई, पंचम आहेत, तसेच बाबा आमटे, मदर तेरेसा, विजय तेंडूलकर आणि पु.ल. देशपांडेदेखील आहेत. विविध भाषा चटकन अवगत करण्याचा निलू यांचा नैसर्गिक कल, सेवाभावी वृत्ती, समाजातील चांगल्या कामासाठी त्यांनी दिलेले कोट्यवधी रुपयांचे दान.. असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू व कार्य पुस्तकात यथोचितपणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे शीर्षकासाठी वापरलेली ‘मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची...’ या ओळीची यथार्तता पटते. निलू यांनी जगभर केलेली मुसाफिरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच वेगळी आहे. त्याविषयी लेखिकेने लिहिलेले हे वाक्य खूप समर्पक आहे - ‘शक्य होईल तितकी माहिती गोळा करायची हे ठरलेलं असायचं, ठरलेलं नसायचं ते कोणत्या गावातील कोणत्या हॉटेलात, किती दिवस मुक्काम करायचा ते.’ ज्या ज्या देशांत निलू गेल्या तिथल्या लोकांमध्ये त्या बिनधास्तपणे मिसळल्या.

स्वतःचे ‘होमलेस बॅगलेडी’ असे निलू यांनी केलेले वर्णन वाचताना त्यांच्यातील विनोदबुद्धी जाणवते. या पलीकडे चांगो देवाचा साक्षात्कार, थायलंडच्या बुद्ध मंदिरातला भिक्षुचा अनुभव, बसरा मोत्याचा आणि पाचूच्या अंगठीचा अनुभव... या गोष्टी निलू यांच्या आयुष्यातले वेगळे आयाम दाखवतात. आंतरिक प्रेमातून उचंबळणारी आई-वडिलांविषयीची कर्तव्यभावना, त्यांच्या उतारवयात त्यांच्या गरजेसाठी नोकरीचा राजीनामा देणं व भारतात येणं अशा अनेक प्रसंगातून निलू यांचे संवेदनशील व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते.

नैराश्याच्या छायेत असलेल्या कोणालाही जगण्याची नवी प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. लेखिकेचे मनोगत आणि भारत सासणे यांची प्रस्तावनाही आशयाला न्याय देणारी असल्याने एक उत्तम कलाकृती वाचल्याचे समाधान हे पुस्तक वाचकाला देते.

  • पुस्तक : निलू निरंजना : गोष्ट हिची पृथ्वीमोलाची

  • लेखिका : मृणालिनी चितळे

  • प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स, पुणे

  • पृष्ठे : २३४, मूल्य : ३०० रु.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.