चेन्नई : तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघावर शतकी धावांचा विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला चेन्नई सुपर किंग्ज संघाला आज हेलकावे खात असलेल्या गुजरातविरुद्ध विजयाची अधिक संधी आहे.
यंदाच्या या आयपीएलमध्ये चेन्नईची सुरुवात निराशाजनक होती. सुरुवातीच्या काही सामन्यांत त्यांचा संघ तळाला होता; परंतु त्यानंतर सामन्यागणिक त्यांनी कामगिरीत सुधारणा केली. आता ते तीन विजयांसह पाचव्या स्थानावर आहेत. त्यांच्या या प्रगतीत संजू सॅमसनच्या दोन शतकी खेळी मोलाच्या ठरल्या आहेत. मुंबईविरुद्ध मिळवलेल्या १०३ धावांच्या विजयात सॅमसनने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती.
आयपीएलचा सात सामन्यांचा पहिला टप्पा पार पडला आहे, त्यामुळे प्लेऑफ गाठण्याची स्पर्धा आता तीव्र होईल. येथून पुढे एकेक विजय मोलाचा ठरणार आहे. सुपरस्टार महेंद्रसिंग धोनी अजून मैदानात उतरलेला नाही; परंतु चेन्नईला सॅमसनच्या रूपाने धोनीसारखा तारणहार सापडला आहे. त्याच्याभोवती संघ बांधला गेला आहे, त्यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाडसह इतर फलंदाजांच्या अपयशाचा तेवढा परिणाम झालेला नाही. आता तर गोलंदाजीत अकील हुसैन हा पॉवरप्लेमध्ये विकेट मिळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज त्यांच्यासाठी निर्णायक ठरत आहे.
चेन्नई संघाला सुरुवातीपासून खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसला आहे. धोनीपासून ते आयुष म्हात्रेपर्यंत महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. आयुषने सहा सामन्यांतून २०१ धावा केल्या होत्या. आयुष स्पर्धेबाहेर गेल्यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड मुंबईविरुद्धच्या सामन्यात सलामीला आला होता. हार्दिक पंड्याच्या स्वैर गोलंदाजीचा त्याने फायदा घेतला होता; परंतु जम बसल्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नव्हती.आजच्या सामन्यात तो या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करेल.चेन्नईच्या मधल्या फळीतील सर्फराझ खान, शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेविस हे आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत; पण त्यांनाही मोठी खेळी करता आलेली नाही. दुबे तर अजूनही फॉर्मच्या शोधात आहे.
चेन्नईसाठी त्यांची गोलंदाजीही जमेची बाजू आहे. अंशुल कंबोज तर १४ विकेट मिळवून आघाडीवर आहे. जेमी ओव्हरटन, नूर अहमद प्रभावी ठरत आहे. गोलंदाजाच्या या भात्यात आता अकील हुसैन असल्यामुळे उद्याच्या सामन्यात गुजरातला विजय मिळवण्यासाठी शर्थ करावी लागेल.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातचा संघ सातव्या स्थानावर आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांना मोठ्या पराभवांचा सामना करावा लागलेला आहे. मुंबईविरुद्धची लढत ९९ धावांनी गमावल्यानंतर बंगळूर संघाने शुक्रवारच्या लढतीत पाच विकेट राखून त्यांना हरवले होते.
या दोन पराभवांतून गुजरातचा संघ कशी उभारी घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे गत स्पर्धा गाजवणारा साई सुदर्शन फॉर्मात आला आहे. त्याने बंगळूरविरुद्ध शानदार शतकी खेळी साकार केली होती. गिलनेही प्रभाव पाडलेला आहे; परंतु गुजरातचा संघ गोलंदाजीत कमी पडत आहे. वास्तविक त्यांच्याकडे कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि ताशी १५४ किमी वेगात चेंडू टाकणारा अशोक शर्मा असे वेगवान गोलंदाज आहेत. राशीद खानसारखा विश्वविख्यात फिरकी गोलंदाज आहे, तरीही बंगळूरविरुद्ध २०५ धावांचे संरक्षण त्यांना करता आले नव्हते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन (इम्पॅक्ट प्लेअरसहित)
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिझूर रहमान. (इम्पॅक्ट प्लेयर: मथीशा पथिराना/शार्दुल ठाकूर
गुजरात टायटन्स (GT)
शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर. साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन. (इम्पॅक्ट प्लेयर: मोहित शर्मा/शाहरुख खान