वसई-विरार महासभेत ओसी नसलेल्या इमारतींच्या पाणी प्रश्नावर चर्चा
esakal April 26, 2026 09:45 PM

इमारतींच्या पाणीप्रश्नावर चर्चा
विरोधी पक्षाकडून प्रशासनाकडून ठोस उपायांची मागणी

विरार, ता. २६ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या महासभेत ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) नसलेल्या इमारतींना पाणीपुरवठा नाकारण्याच्या निर्णयावरून जोरदार वाद झाला. न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा ऐरणीवर आला असून, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रशासनाकडून ठोस भूमिका मांडण्याची मागणी केली आहे.

पाटील यांनी सभेत सांगितले की, ओसी नसलेल्या इमारतींमध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. केवळ कागदपत्रांच्या कमतरतेमुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. याबाबत महापालिका न्यायालयात जाणार का?, तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष याचिका दाखल करणार का?, यावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, नगरसेवक पंकज देशमुख यांनी अनधिकृत नळजोडण्या व पाणीचोरीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर महापौर अजीव पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन बंधनकारक असले तरी नागरिकांचे हित सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले. या तांत्रिक अडचणीवर कायदेशीर मार्ग शोधला जाईल आणि गरज पडल्यास न्यायालयात दाद मागण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापौरांच्या आश्वासनानंतर सभेतील तणाव काहीसा निवळला असला, तरी आता या प्रश्नावर महापालिका नेमकी काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.