पुणे - इस्रायल-अमेरिका, इराणमधील यांच्यामध्ये सध्या युद्धबंदी असली तरी या युद्धाला मंगळवारी (ता. २७) दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, या युद्धाचे परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठांवर अद्यापही कायम असून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापही व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळितच असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून काळ्याबाजाराला ऊत आला आहे. या विस्कळितपणामुळे छोटे व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत असून, त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
मंचर - खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांमध्ये सध्या व्यावसायिक (१९ किलो) गॅस सिलिंडरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाला असून, दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या तीन तालुक्यांत सुमारे १० हजारांपेक्षा अधिक व्यावसायिक ग्राहक आहेत.
याशिवाय, पूर्वी २४ तासांच्या आत उपलब्ध होणारा सिलिंडर आता एकूण मागणीपैकी २० टक्केच मिळतो. तर बाजारात ब्लॅक मार्केटचे प्रमाणही वाढल्याची चर्चा आहे. अधिकृतपणे उपलब्ध नसलेला सिलिंडर तीन ते चार हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती मिळत असून, हा दर नियमित किमतीपेक्षा दुप्पट रुपयांनी अधिक आहे.
एकूणच, गॅस सिलिंडरचा वाढलेला दर, पुरवठ्यातील विलंब आणि ब्लॅक मार्केटमुळे खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. कंपन्यांकडून वितरकांना पूर्वी प्रमाणे गॅस सिलिंडर मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. एकूण गॅस सिलिंडर टाक्यांपैकी सध्या कंपन्यांकडून २० टक्केच पुरवठा केला जात आहे. व्यावसायिक गॅस टंचाईबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
चाकणला काळ्याबाजाराचा ऊत
चाकण - चाकण व औद्योगिक वसाहत परिसरात दर महिन्याला हॉटेल, ढाबे ,खानावळी, कंपन्या यांच्यासाठी व्यावसायिक वापराचे गॅस विविध एजन्सी, खासगी कंपन्या यांच्याकडून दर महिन्याला दहा हजारांपेक्षा गॅस वितरित केले जायचे; परंतु गेल्या दीड महिन्यांपासून गॅस मिळणे ठप्प झाल्याने अगदी १५ दिवसांनंतर विविध कंपन्यांच्या एजन्सींना अगदी ५०, १०० सिलिंडर मिळत असल्याने वितरण व्यवस्थित होत नाही. सिलिंडर बाजारात मिळत नसल्याने काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे काही छोट्या व्यावसायिकांना मात्र मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही हॉटेल चालकांनी हॉटेलही बंद केली आहेत.