पुणे - एप्रिलच्या रखरखत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले असून, पारा ४० अंशांकडे सरकल्याने शहरात उष्णतेची लाट जाणवत आहे. अशातच दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असले, तरी थंडावा मिळविण्यासाठी नागरिक, लहान मुलांनी जलतरण तलावांवर गर्दी केली आहे. विरंगुळा, आरोग्य या दोन्ही उद्देशांनी सध्या जलतरण तलाव हाउसफुल्ल असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
वर्षभर दिवसाला ५०-६० जणांचा वावर असलेल्या तलावांत आता हीच संख्या ३५०-४०० पर्यंत पोहोचली आहे. नियमित सदस्यांसोबत ‘समर स्पेशल’ बॅचेसमुळे तलाव दिवसभर गजबजलेले दिसतात. त्यात लहान मुलांचा सहभागही आहे. काही ठिकाणी अडीच ते तीन वर्षांच्या बालकांसाठी स्वतंत्र बेबी पूलची सुविधा आहे.
महिलांसाठी स्वतंत्र वेळा, सुरक्षित वातावरणामुळे त्यांचाही सहभाग वाढला आहे. प्रत्येक बॅचमध्ये प्रशिक्षित लाइफगार्ड, सीसीटीव्ही देखरेख, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोहण्यासाठी मासिक शुल्क एक ते तीन हजार रुपयांदरम्यान असून, काही क्लब उन्हाळी सवलतीही देत आहेत.
सकाळी सहापासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत सुमारे १५-१६ बॅचेस घेतल्या जातात. पाण्याची पातळी, स्वच्छता आणि पीएच स्तर दररोज तपासला जातो. नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे लाइफसेव्हरची संख्या वाढविली आहे.
- राजेश सपकाळ, क्रीडा व्यवस्थापक, सोलारिस स्पोर्ट्स क्लब
उन्हाळा सुरू होताच महापालिकेतर्फे शहरातील सर्व जलतरण तलावांची सखोल पाहणी केली. प्रत्येक तलावावर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, याची खात्री केली असून, सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी जीवरक्षक उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी केली. याशिवाय शहरातील सर्व प्रशिक्षकांना ‘जीवरक्षक’ प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- आशा राऊत, महापालिका उपायुक्त, क्रीडा विभाग