बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाला कंटाळला, बहिणीचे पैसे काढण्यासाठी भावाने चक्क स्मशानभूमीत पुरलेला सांगाडा आणला, नेमकं काय घडलं?
जयदीप मेढे April 28, 2026 03:13 PM

Odisha News: बँकेच्या कागदोपत्री नियमांमुळे आणि प्रशासकीय संवेदनशून्यतेमुळे एका हताश भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत आणण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशाच्या केओन्झर जिल्ह्यातील पाटना ब्लॉकमधील ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली असून, व्यवस्थेच्या अजब कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

Odisha News: नेमकी घटना काय?

दियानाली गावातील रहिवासी असलेल्या जितू मुंडा (50) यांची मोठी बहीण कालरा मुंडा (56) यांचे दोन महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. कालरा यांनी जनावरे विकून कष्टाने कमावलेले 20,000 रुपये 'ओडिशा ग्रामीण बँके'च्या मालीपोसी शाखेत जमा होते. कालरा यांचा कोणताही वारस हयात नसल्याने, त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जितू मुंडा वारंवार बँकेत चकरा मारत होते.

Odisha News: बँकेची अट आणि जितू यांचा टोकाचा निर्णय

अशिक्षित असलेल्या जितू मुंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बँक अधिकाऱ्यांना बहिणीच्या निधनाची कल्पना वारंवार दिली होती. मात्र, बँकेने त्यांना मृत्यू प्रमाणपत्र किंवा 'खातेदाराला स्वतः घेऊन या' अशी तांत्रिक अट घातल्याचा आरोप केला जात आहे. हताश झालेल्या जितू यांनी अखेर स्मशानभूमीत जाऊन बहिणीची कबर खोदली आणि मृत्यूचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा गोणीत भरून थेट बँकेत आणला.

Odisha News: पोलिसांची मध्यस्थी आणि मदतीचे आश्वासन

बँकेत सांगाडा पाहून कर्मचारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पाटना पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण प्रसाद साहू यांनी बँकेत धाव घेतली. "जितू हा अशिक्षित असून त्याला कायदेशीर प्रक्रियेची माहिती नाही. बँक अधिकारी त्याला योग्य प्रक्रिया समजावून सांगण्यात अपयशी ठरले आहेत," असे मत पोलिसांनी व्यक्त केले. त्यानंतर, पोलिसांनी मध्यस्थी करत जितू यांना बहिणीच्या खात्यातील पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि तो सांगाडा पुन्हा सन्मानपूर्वक दफन करण्यात आला.

Odisha News: प्रशासनाची भूमिका

या घटनेनंतर स्थानिक गटविकास अधिकारी (BDO) मानस दंडपत यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. कालरा मुंडा यांच्या खात्यातील मूळ वारसदाराचाही मृत्यू झाल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, आता जितू मुंडा हेच एकमेव दावेदार असल्याने त्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत, असे निर्देश प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आणखी वाचा 

West Bengal Election 2026: मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.