NESCO Concert Drug Overdose Case Actress Jiya Jacob Arrested: काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या मुंबईच्या (Mumbai Crime) गोरेगावमधील नेस्को ड्रग्ज प्रकरणानं (NESCO Drugs Case) सर्वांना हादरवून सोडलं. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला, तसतशा या प्रकरणातल्या आणखी काही गोष्टी समोर आल्या. पण, तेवढ्यात या प्रकरणात आणखी एक खळबळजनक (NESCO Concert Drug Case) घटना घडली. बॉलिवूडच्या (Bollywood News) 33 वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. तपासादरम्यान, पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागले. पोलिसांनी याबाबत जी माहिती दिली, ती आणखीनच हादरवणारी होती. या प्रकरणाचा फरार आरोपी आणि ड्रग्ज सप्लायर महेश खेमलानी ऊर्फ मार्क याच्यासोबत अभिनेत्री जिया जेकब ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तसेच, तिचं महेश खेमलानीसोबत जॉईंट अकाउंट होतं. तसेच, दोघांच्या जॉईंट अकाउंटमध्ये सुमारे 14 लाख 95 हजार 400 रुपये जमा करण्यात आलेले. ही सगळी रक्कम अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळवल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत आहेत.
पोलिसांनी अटक केल्यानंतर अभिनेत्री जिया जेकब हिला न्यायालयात हजर करण्यात आलं. आधीपासूनच पोलीस कोठडीत असलेल्या जिया जेकबच्या पोलीस कोठडीत बोरीवली न्यायालयानं 30 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला. वनराई पोलीस ठाण्याचे मुख्य तपास अधिकारी निरीक्षक महेश महाले यांनी तिच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिया जेकब 2012 पासून ड्रग्ज सप्लायर महेश खेमलानी ऊर्फ मार्क याच्या संपर्कात होती. गेल्या चार वर्षांपासून दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. खासगी बँकेत दोघांनी जॉईंट अकाउंट उघडलं असून दोघेही ते वापरायचे.
दरम्यान, गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्ज सप्लायर महेश खेमलानी ऊर्फ मार्क सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अभिनेत्री जिया जेकब हिच्या खात्यावर मार्कनं पैशांचे व्यवहारही केले होते. मार्कनं सांगितल्यानंतर आरोपी आनंद पटेल, विनीत गैरेलानी आणि आयुष साहित्य यांनी तब्बल 4.37 लाख रुपये पाठवले होते. हे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेले. हे पैसे पाठवण्यासाठी जियाच्या बँकेचा स्कॅनर मार्कनंच आरोपींना पाठविल्याचं तपासात समोर आलं आहे. तसेच, फरार आरोपी मार्क कुठे आहे? याबाबत जियाला माहिती आहे, असा पोलिसांचा दावा आहे. तर, मार्क पळून परदेशात जाऊन लपल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.