अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या रोमँटिक थ्रिलर चित्रपट ‘प्यार तूने क्या किया’ला तब्बल 25 वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने उर्मिलाने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत त्या आठवणींना उजाळा दिला आहे.
2001 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील वेगळ्या धाटणीचा सायकोलॉजिकल थ्रिलर मानला जातो. या चित्रपटात उर्मिलाने ‘रिया’ नावाच्या एका तरुणीची भूमिका साकारली होती. जी एकतर्फी प्रेमात आकंठ बुडून जाते आणि त्या प्रेमासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार होते.
तिच्या या ‘जुनूनी प्रेमिका’च्या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन रजत मुखर्जी यांनी केले होते. तर अभिनेता फरदीन खान याने ‘जय’ नावाच्या यशस्वी फोटोग्राफरची भूमिका साकारली होती. कथानकानुसार, गोव्यात जय आणि रिया यांची भेट होते.
रिया जयच्या प्रेमात पडते; मात्र हे प्रेम हळूहळू टोकापर्यंत पोहोचते. एकतर्फी प्रेम, आसक्ती आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक संघर्ष यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.
चित्रपटाचे संगीतही विशेष गाजले. विशेषतः ‘प्यार तूने क्या किया’ हे शीर्षक गीत आजही लोकप्रिय आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सरासरी यश मिळाले असले तरीही त्याची कथा, सादरीकरण आणि उर्मिला मातोंडकरचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.