Maharashtra Temperature Today : हवामानात मोठा बदल, पुढील काही तास धोक्याची, थेट..
Tv9 Marathi April 29, 2026 11:45 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता उष्णता कमालीची वाढली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अकोला, अमरावती येथे 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. शाळांच्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्यात आलीत. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज थोडासा दिलासा उष्णतेपासून मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोदिंया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी केला. ज्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र, काही भागात अजूनही उष्णता कायम असेल.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा कहर कायम आहे. सलग काही दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या पुढे जात असल्याने शहर अक्षरशः तापले आहे.दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसत असून अत्यावश्यक कामांशिवायनागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. डॉक्टरांकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम आहे. मागील पाच दिवसांपासून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. आजही तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून गरम वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून 11 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पार 40 अंश सेल्सिअस वर पोहोचला असून उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. गेल्या आठ दिवसापासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी सुद्धा झपाट्याने कमी झाली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आज कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.