Sanjay Raut : मीरा रोड मध्ये धर्म विचारुन मारलं, यावर संजय राऊत यांचं उत्तर म्हणजे शिवसेनेच्या राजकीय भूमिकेतला मोठा बदल
Tv9 Marathi April 29, 2026 02:45 PM

“कोणत्या परिस्थितीत या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि होतायत हे मी तुम्हाला सांगायला नको. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी अडीच लाख पॅरा मिलिट्री फोर्स मोदी आणि शाहनी पश्चिम बंगालला नेऊन ठेवली.अशा पद्धतीने निवडणुका जिंकतात. पुण्यात, पिंपरी चिंचवडला काय झालं, याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. ठीक आहे. आम्ही लढणार लोक आहोत, पाहू” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “साम, दाम, दंड भेदाचा वापर झाला, होताय. यापेक्षा प्रशासकीय, निवडणूक आयोगाचा दहशतवाद. ही अत्यंत गंभीर गोष्ट देशाच्या लोकशाहीत घडतेय. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतोय” असा आरोप संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल निवडणुकी संदर्भात केला.

“अशा प्रकारचे एन्काऊंटर स्पेशलिस्ट वैगेर नेऊन निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदीसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी, नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. उद्या अंतराळात राजकारण सुरु झालं, तर ते तिथले नेते होतील. जोडीला अमित शाह आहेत. तरीही त्यांना अशा प्रकारे राज्या राज्यातील टेरर पोलीस फोर्स नेऊन लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येत आहे. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतोय. पराभवाचं रुपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्यावप करावे लागत आहेत” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कळेल

“आमचा एकच उमेदवार आहे, सगळ्यांचा मिळून. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे. आमचा एक उमदेवार आहे. उद्या ११ वाजता आपल्याला कळेल. विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कळेल. उद्या उमेदवार पाऱ्या चढताना दिसला की, तुम्ही ब्रेकिंग न्यूज द्या” असं मविआच्या उमेदवाराबद्दल संजय राऊत म्हणाले.

त्यांनी विधिमंडळात   जायला पाहिजे

“आमची इच्छा का नसावी. मी पहिला माणूस आहे सांगणार त्यांनी विधिमंडळात त्यांनी जायला पाहिजे. सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील या प्रमुख नेत्यांनी त्यांना विनंती केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन मविआचं नेतृत्व करावं अशी सर्वांची भूमिका आहे” असं संजय राऊत म्हणाले.

बच्चू कडू म्हणजे लढणारा नेता

“बच्चू कडू पक्ष विलीन करणार हे त्यांना विचारा. शिवसेना फोडली नाही. ज्या पद्धतीने देशभरात राजकारण सुरु आहे. तुम्ही म्हणालं आप फुटली, मी असं म्हणणार नाही. ज्या पद्धतीने दहशतीचा वापर करुन लोकांवर दबाव आणून आमिषं दाखवून लोकांना बाजूला केलं जातं, ही पक्षफुट नाही, हा डरपोकपणा आहे. बच्चू कडू यांच्यावर कुठला दबाव आहे मला माहित नाही. लढणारा नेता म्हणून आम्ही त्यांना ओळखतो” असं संजय राऊत म्हणाले.

मीरारोडच्या घटनेवर काय म्हणाले?

मीरारोडमध्ये धर्म विचारुन मारलं जातय, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत त्यावर संजय राऊत म्हणाले की, “हे देशभरात सुरु आहे. एकाच धर्माकडून हे होत नाहीय. सर्व धर्मांकडून गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जातय. या देशातील शांतता, सुरक्षा, धर्म स्वातंत्र्य हे सगळं संकटात आणायला भाजपं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी जबाबदार आहे”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.