सुपीक जमीन, पुण्यात फ्लॅट्स अन् कर्नाटकात… भोंदू मनोहर भोसलेच्या मालमत्तेची कुंडली उघड, आकडा पाहून डोळे फिरतील!
Tv9 Marathi April 29, 2026 02:45 PM

भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणारा आणि स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदूबाबा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याने अल्पावधीत उभ्या केलेल्या अफाट संपत्तीचा पर्दाफाश झाला आहे. सोलापूर, अहिल्यानगर आणि पुण्यासह थेट कर्नाटकपर्यंत या भोंदूबाबाने आपल्या मालमत्तेचे जाळे विणल्याचे समोर आले आहे. कर्जतच्या चिलवडीत त्याची २५ एकर जमीन असून त्याच्या सातबाऱ्याने खळबळ उडवून दिली आहे.

कर्जतच्या चिलवडीत २५ एकरचे लँड बँकिंग

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिलवडी हे गाव कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येते. अत्यंत सुपीक आणि सिंचनाची सोय असलेल्या या भागात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. चिलवडी येथील गट नंबर २२ मध्ये मनोहर चंद्रकांत भोसले याच्या नावावर तब्बल २५ एकर शेती असल्याचे सातबाऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. सध्या या परिसरात जमिनीचा दर प्रति एकरी २० ते २५ लाख रुपये असून, केवळ या एकाच ठिकाणी त्याने ५ ते ६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा आहे.

कुटुंबियांच्या नावे मालमत्तेचा डोंगर

मनोहर भोसलेने स्वतःच्या नावाबरोबरच पत्नी आणि वडिलांच्या नावेही मोठी मालमत्ता जमा केली आहे. करमाळ्यातील घोटीमध्ये मनोहरची पत्नी रूपाली भोसले हिच्या नावावर घोटी येथे तब्बल २७ एकर जमीन आहे. ही जमीन बागायती असून त्याची किंमतही कोटींच्या घरात आहे. तसेच मनोहर भोसलेचे मूळ गाव असलेल्या उंदरगावमध्ये त्याचे वडील चंद्रकांत भोसले यांच्या नावे असलेल्या २ एकर जमीन आहे. याच जमिनीवर त्याने मोठा मठ उभारला आहे. हा मठ त्याच्या बेकायदेशीर कारवायांचे केंद्र असल्याचे बोलले जातं आहे.

पुण्यात फ्लॅट्स अन् गाणगापुरात आश्रम

ग्रामीण भागासोबतच मनोहर बाबाचे पाय शहरातही खोलवर रुतलेले आहेत. पुणे शहराच्या पूर्व भागातील मांजरी आणि हडपसर सारख्या विकसित भागात त्याचे आलिशान फ्लॅट्स असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गाणगापूर येथेही एका भव्य आश्रमाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. या सर्व बांधकामांसाठी लागणारा पैसा भक्तांच्या दानातून की फसवणुकीतून आला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अल्पवधीत करोडपती कसा झाला?

काही वर्षांपूर्वी सामान्य आयुष्य जगणारा मनोहर मामा अचानक इतका श्रीमंत कसा झाला, असा सवाल उपस्थित होत आहे. लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या नावाखाली मोठी दक्षिणा उकळणे, जमिनीचे व्यवहार करणे आणि भीती घालून पैसे उकळणे यातून त्याने ही माया जमवल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यातच आता चिलवडीचा सातबारा समोर आल्याने या भोंदूबाबाच्या आर्थिक साम्राज्याची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.