Vidhan Parishad Election : छाटले जरी पंख माझे..विधान परिषदेसाठी पत्ता कापताच भाजप आमदाराच्या भावनांचा बांध फुटला
Tv9 Marathi April 29, 2026 02:45 PM

विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार? याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काल भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. यात विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सहा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आली आहे. भाजपने काल रात्री त्यांच्या सहा उमेदवारांची यादी नावं जाहीर केली आहेत. भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर आणि प्रज्ञा सातव यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवारी देताना भाजपने प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिलं आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपने त्यांना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेचं तिकीट दिलं आहे.

मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली

भाजपने उमेदवारी देताना नवऱ्या चेहऱ्यांबरोबर पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा विचार केला आहे. पण यामध्ये भाजपाचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचं व्हाट्सअप स्टेटस चर्चेत आहे. ते नाराज असल्याची चर्चा आहे. कारण त्यांना विधान परिषदेवर फक्त 13 महिने संधी मिळाली. त्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. भाजपकडून उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी व्हाट्सअप स्टेटसवर कविता ठेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी आमदार संजय केनेकर यांची ओळख आहे.

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

संजय केनेकर हे मागच्या 35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी भाजपमध्ये वेगवेगळी पद, जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत. मागच्यावर्षी मार्च महिन्यात त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.