लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प एक मेपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे लोणावळा आणि खंडाळा परिसरातील नागरिकांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. तसेच पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, खाद्यपदार्थ व्यवसाय आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
बोरघाटात सतत वाहतूक कोंडी, अपघात, दरड कोसळणे आणि संथ वाहतुकीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झालेल्यांसाठी हा नवा रस्ता फायद्याचा ठरणार आहे. द्रुतगती मार्गावर खोपोली ते कुसगावदरम्यानचा घाट विभाग हा धोकादायक मानला जातो. तीव्र उतार, नागमोडी वळणे आणि वारंवार अपघात यामुळे या भागाला ‘डेंजर झोन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यावर ‘मिसिंग लिंक’मुळे प्रकल्प उपाय ठरू शकतो.
सुट्टीच्या दिवशी, विशेषतः शनिवार-रविवार आणि पावसाळ्यात लोणावळा शहरात वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच द्रुतगती मार्गावर खोळंबा झाल्यास अनेक वाहने लोणावळा शहरातून पर्यायी मार्ग शोधत जातात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर ताण निर्माण होतो. खोपोली ते लोणावळा मार्गावर स्थानिकांनाही त्रास होतो. पण, आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर घाटातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
स्थानिकांना होणारे फायदे
वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेची बचत
खोपोली ते लोणावळा प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल
दरडींसारख्या सारख्या नैसर्गिक आपत्तींपासून सुटका
आर्थिक आणि पर्यटन विकास व पर्यटनाला गती
स्थानिक व्यवसायास चालना
घाटात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागायचे. पर्यटक नाराज व्हायचे. घाटातील वाहतूक कोंडी आणि अपघात ही मोठी समस्या होती. ‘मिसिंग लिंक’मुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
- महेंद्र पाठारे, वाहतूक व्यावसायिक
वाहतूक कोंडी तसेच लोणावळ्यातील बदलत्या परिस्थितीमुळे येथील पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. वाहतूक सुधारल्यास पर्यटकांचा प्रतिसाद आणखी वाढेल. लोणावळ्यातील पर्यटन व्यवसायाला याचा सकारात्मक फायदा होईल.
- मंगेश आगरवाल, व्यावसायिक