स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : संभ्रमाची.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंतःपुरात येरझारा घालत आहेत. काय करावे? कसे करावे? करावे की करो नये? कधी करावे? का करावे? नानाविध प्रश्नांची भेंडोळी मनात सुटत आहेत, गुंतत आहेत. हवेत दोन-तीन तलवारीचे हात करून बघतात. खांद्यात कळ मारल्याने आवरते घेतात. अब आगे...
उधोजीराजे : कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने आत येऊन) महाराजांचा विजय असो! मुजरा महाराज! बोला! कशापायी याद केलीत?
उधोजीराजे : (भडकून) याद कशाला करू? हः!! आमच्या न्याहारीची तयारी कुठवर आली?
संजयाजी फर्जंद : (अदबीनं) आमलेट तयार होतंय! डब्बल पलटी!! थोडी कळ काढा, आणतोच!!
उधोजीराजे : रोज कसली अंडी घालता...खायला?
संजयाजी फर्जंद : अंड्यात प्रथिनं असतात! संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!! अंड्याने होत आहे रे, आधी अंडेचि पाहिजे..!
उधोजीराजे : (धुमसत कडवटपणाने) अंड्यांवरून आम्हाला एक जहरी टोमणा सुचलाय, पण नाही मारत!..तुम्ही समजून घ्या!! नंतर म्हणाल, हा उधोजीराजा भारी टोमणे मारतो!! इथे महाराष्ट्रासमोर केवढा गहन प्रश्न उभा राहिलाय, आणि तुम्ही अंडी खाताय, अंडी!! कमाल आहे तुमची!!
संजयाजी फर्जंद : (चतुराईनं) महाराष्ट्रासमोरचा गहन प्रश्न तुम्हीच चुटकीसरशी सोडवू शकता, महाराज! सवाल एकच आहे, वरिष्ठ सभागृहात कोण जाणार?
उधोजीराजे : (कपाळ चेपत) विचार करोन मस्तक फुटायची वेळ आली!! लिंबूपाणी आणा...
संजयाजी फर्जंद : (आग्रहाने) महाराज, या एकनिष्ठ फर्जंदाचं ऐका, निर्णय घ्या!! वरिष्ठ सभागृहातलं आसन ते तुमची वाट पाहातं आहे, तिथं जाऊन बसा! मग बघा, महाराष्ट्र कसा लायनीवर येतो ते!!
उधोजीराजे : (गोंधळून) कसला निर्णय? छे बुवा!! आमचा निर्णय झालाय! न्याहारीला अंडी की कांदेपोहे असा ऑप्शन आम्हाला होता, आम्ही पोहे निवडले होते...
संजयाजी फर्जंद : हे काय बोलणं झालं महाराज? हे का पोहे खाण्याचे दिवस आहेत?
उधोजीराजे : मग काय अंडी खायचे दिवस आहेत?
संजयाजी फर्जंद : (मखलाशी करत) गैरसमज होतोय, महाराज! अंडी कशाला? उमेदवारी जाहीर करा, विजय आपलाच आहे! तुम्ही सभागृहात शोभून दिसला पाहिजेत! आपल्या आघाडीची शान आहात तुम्ही! तुम्ही तिथं गेल्याबिगर महाराष्ट्राच्या दौलतीचं भलं कसं होणार?
उधोजीराजे : (गुळमुळीतपणाने) बघू!
संजयाजी फर्जंद : (अदबीनं) बघू म्हणून कसं चालेल? महाराष्ट्र वाट बघतोय!..(सेवकाने आणून दिलेली बशी पुढे करत) हे घ्या, आमलेट!
उधोजीराजे : (संभ्रमात येरझारा घालत) टु बी ऑर नॉट टु बी...हा एकच सवाल आहे...
...जावे की न जावे? जावे बिनधास्त त्या वरिष्ठ सभागृहात आणि बसावे दोन घटका आरामात की इथेच घरात बसून खावे आमलेट? करावे वर्क फ्रॉम होम आयुष्यभर की तडफडावे त्या दक्षिण मुंबईतल्या दरिद्री ट्राफिकमध्ये... नको नको म्हणत, आपणच बसावे त्या खुर्चीत, की देऊन टाकावी तीच खुर्ची आमच्या अंबादासजींना? जावे ‘सिल्वर ओक’वर की...की...मध्यरात्री ‘वर्षा’वर? इथंच तर मेख आहे...विधात्या, तू इतका कठोर का झालास? ज्यांना आम्ही घडवलं, ते गेले खोक्यात बसून, आणि सामील झाले सायसंगीन सत्ताखेळात, आणि ज्यांनी आम्हाला घडवलं, तो तू आम्हाला विसरतोस? मग आमचं काय? आम्ही घरातच बसून फक्त आमलेट खायचं?