विधान परिषद निवडणूक 2026 वर हर्षवर्धन सपकाळ: विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र याच विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या (Ambadas Danve) नावाची घोषणा करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनंही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. (Harshwardhan Sapkal On Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी भूमिका महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली. इंडिया आघाडी म्हणून जेव्हा निर्णय होतात, त्याची एक पद्धत आहे. विधान परिषदेच्या उमेदवारी बद्दल प्रक्रिया झाली नाही. आगामी काळातील भूमिका ठरवणं गरजेचं आहे. चर्चेत खोळंबा झाल्यामुळे, उमेदवारी अर्ज भरण्यापासून आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. आवश्यक विश्लेषण होत राहिलं, सगळी उत्तरं आताच द्यायची गरज नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. (Harshwardhan Sapkal On Vidhan Parishad Election 2026)
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा होता तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरु झाल्याचं दिसून येत आहे. तसेच काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यास अंबादास दानवेंना विजयासाठी मोठी कसरत करावी लागू शकते.
एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात, वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपने विधान परिषद निवडणुकीत सातवा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. कालच सहा उमेदवार जाहीर करणार भाजप, अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू झाला आहे आणि याच वादाचा फायदा उचलण्याच्या तयारीत भाजप आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)
आणखी वाचा