Ashok kharat : लिंगपिसाट खरातकडे सापडला काळा दगड, गूढ वाढलं; दगडावरून कोर्टातही खडाजंगी
Tv9 Marathi April 30, 2026 05:45 PM

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात रोज नव्या गोष्टी उघड होत आहेत. आधी ओशनो जल नंतर चिंचोके आणि इतर गोष्टी समोर आल्या. त्यामुळे सर्वच थक्क झाले होते. आता या प्रकरणात काळा दगडाचाही उल्लेख झाला आहे. आज कोर्टात हा दगड आणला गेला होता. त्यावरून आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये खडाजंगी झाली होती. या काळ्या दगडाचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलाचं म्हणणं पडलं तर काळ्या दगडाचा काय तपास करणार? असा सवाल आरोपीच्या वकिलाने केला. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र, खरातच्या कार्यालयात सापडलेल्या या काळ्या दगडाचं गूढ अद्याप उकललं गेलं नाही. काळा दगड त्याने कशासाठी ठेवला होता? त्यामागचा हेतू काय होता? हे सर्व गुलदस्त्यात आहे.

आठव्या गुन्ह्यासाठी आज अशोक खरातच्या कोठडीवर सुनावणी होती. यावेळी तपास अधिकाऱ्याने तपासाची माहिती कोर्टाला दिली. खरातकडून महिलांच्या लैंगिक अत्याचाराची माहिती घेतली असता तो काही तरी मनातल्या मनात पुटपुट होता. तो नक्की काय बडबड करत होता, त्याचा तपास करायचा आहे. काही पुरावे मिळाले आहेत. त्याची आरोपी समक्ष चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी मिळावी. खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी ही आमची मागणी आहे, असं तपास अधिकाऱ्याने कोर्टाला सांगितलं. तसेच, पीडितेच्या कुटुंबियांची आरोपी सोबत ओळख होती. अनेक महिलांची फसवणूक त्याने केली आहे, त्याचाही तपास करायचा असल्याचं तपास अधिकाऱ्याने सांगितलं.

दोन्ही वकिलांचा जोरदार युक्तिवाद

यावेळी सरकारी वकिलानेही युक्तिवाद केला. खरातच्या कार्यालयात काळा दगड आणि इतर वस्तू मिळाल्या आहेत. त्याने या वस्तू का ठेवल्या? या वस्तूंचा तो काय उपयोग करत होता? काळ्या दगडाची नेमकी भानगड काय आहे? याचा तपास करायचा आहे, त्यामुळे त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलाने केली.

सरकारी वकिलाच्या या मागणीला आरोपीच्या वकिलाने कडाडून विरोध केला. आज जो कागद मला दिसतोय त्यात काही चौकशी करावी, अशी आवश्यकता वाटत नाही. काळा दगड आणि इतर तेच चिंचोके याचा तपास काय करणार आहात? ह्या प्रकरणाची माहिती नेमकी काय आहे? सीसीटीव्ही काय आहे? आर्थिक व्यवहार काय आहे? त्याचा तपास काय केला जाणार आहे, असं आरोपीचे वकील म्हणाले.

पहिल्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही होते. आता काय तपास करणार? पहिल्या काही गुन्ह्यात तपास केला. त्याचा पुढे काय तपास करणार आहे? पुढे तपास सुरू आहे, मागे काही तपास होता तो केला जाणार नाही हे कस शक्य असेल? असा युक्तिवादही आरोपीच्या वकिलाने केला.

त्यावर सरकारी वकिलानेही जोरदार युक्तिवाद केला. इतर गुन्ह्यांमध्ये काळा दगड मिळाला नव्हता. या गुन्ह्यात हा दगड पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे गूढ वाढले आहे. म्हणूनच हा महत्वाचा पुरावा असणार आहे. त्याचा तपास करायचा आहे. म्हणून आरोपीला कोठडी मिळावी, असं सरकारी वकील म्हणाले.

तपासाला वेळ लागेल

तर, गुहांमध्ये पीडित आणि तिचे सर्व कुटुंबीय अशोक खरातकडे जात होते. त्यामुळे ह्या तपासाला वेळ लागेल आणि त्यात पुरावे एसआयटीकडे आहे. त्यांचा तपास सुरू असणार आहे, असंही तपास अधिकाऱ्याने सांगितलं.

तोच गुन्हा आहे, काय तपास करणार?

यावर आरोपीच्या वकिलाने पुन्हा आपली बाजू मांडली. आर्थिक व्यवहार झाले आहे असा अंदाज आहे, असे इतर गुन्ह्यात लिहिले नाही. काळा दगड गेल्या नऊ गुन्ह्यात शोधला असेल मग आता पुन्हा तो ह्या गुन्ह्यात कसा आला? परत तोच गुन्हा आहे. त्यात अधिक काय तपास करणार आहात? असा सवाल आरोपीच्या वकिलाने केला.

पहिल्यांदाच पोलीस कोठडी नाकारली

दरम्यान, दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने 8 व्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी नाकारली. एसआयटी आणि सरकारी वकिलांनी खरातला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्याला 12 तारखेपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर 9 व्या गुन्ह्यात पुन्हा अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून अर्ज करण्यात आला आहे. उद्या पुन्हा अशोक खरातला कोर्टात हजर करणार आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाने पहिल्यांदाच अशोक खरातची पोलीस कोठडी नाकारली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.