LPG Crisis : सिलेंडर घेऊन फ्लॅटचे जिने चढला म्हणून डिलिव्हरी बॉयला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो का? गृहिणींनो तुम्ही तर गंडवला जात नाही ना? नियम काय?
Tv9 Marathi April 30, 2026 05:45 PM

बऱ्याचदा आपल्याला दैनंदिन जीवनातील नियम माहित नसतात. त्यामुळे आपली फसगत होण्याची शंभर नव्हे तर दोनशे टक्के शक्यता असते. गोष्टी साध्या साध्या असतात मात्र त्याचा मोठा फरक पडतो. आता एलपीजी गॅस सिलेंडरचंच पाहा ना. गॅस सिलेंडर खांद्यावर घेऊन फ्लॅटचे जिने चढून डीलिव्हरी बॉय येतो. जिने चढून आलो म्हणून तो एक्स्ट्रा चार्ज मागतो. 20 ते 50 रुपयांची तो मागणी करतो. गृहिणी त्याला एक्स्ट्रा चार्जही देतात. कधी कधी त्यावरून भांडणं होतात. पण खरंच त्याला एक्स्ट्रा चार्ज दिला पाहिजे का? नियम काय सांगतो?

नियमानुसार, तुम्ही जेव्हा गॅसचं बिल भरता तेव्हा त्यात डीलिव्हरी चार्जचाही समावेश असतो. घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरापर्यंत पोहोचवणं हे डीलिव्हरी बॉयची जबाबादारी आहे. त्यासाठी तो एक कवडीही एक्स्ट्रा मागू शकत नाही, असा तेल कंपन्यांचा सक्तीचा नियम आहे. त्यामुळे या पुढे हा नियम लक्षात ठेवा. तुम्ही गंडवले जाणार नाही याची खबरदारी घ्या.

नियम काय सांगतो?

बिलातच रकमेचा समावेश – गॅस सिलेंडरची जी एमआरपी ठरवली जाते, त्यातच तुमच्या घरापर्यंतच्या परिवहन शुल्काचा समावेश करण्यात आलेला असतो. त्यामुळे तुमच्याकडून कुणीही अतिरिक्त परिवहन शुल्क आकारू शकत नाही.

मजल्याची कोणतीच मर्यादा नाही – नियमानुसार, सिलेंडर तुमच्या घरातील किचनपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. मग तुमचे घर कोणत्याही मजल्यावर असले तरी.

टीपची गरज नाही – डीलिव्हरी बॉयला टीप द्यायची गरज नाही. तुम्ही स्वखुशीने देत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण अधिकार म्हणून टीप मागणं हे बेकायदेशीर असून नियमांच्या विरोधात आहे.

तक्रार कुठे कराल?

कोणत्याही प्रकारे अवैधपणे वसुली केल्यास किंवा अधिक पैशाची मागणी केल्यास तुम्ही 1800-233-3555 या नंबरवर कॉल करू शकता.

तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीच्या मॅनेजरला फोन करू शकता. तसेच तक्रार पुस्तिकेतही तक्रारीची नोंद करू शकता.

इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम वा एचपी गॅसच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन तक्रारही करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

डीलिव्हरी बॉयला नेहमीच मशीन जनरेटेड पावती मागा. त्यातील लिहिलेली रक्कमच त्याला द्या.

पैसे देण्यापूर्वनी वजन मशीनने सिलेंडरचं वजन चेक करा. सिलेंडरचे सील तोडलेले तर नाही ना? याचीही खातरजमा करा.

रोख रक्कम देण्याऐवजी ऑनलाईन पेमेंट करण्यावर भर द्या. त्यामुळे अतिरिक्त पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही.

तक्रारीनंतर काय कारवाई होते?

तक्रार वाजवी असेल तर पेट्रोलियम कंपन्यांसंबंधित गॅस एजन्सीला मोठा आर्थिक दंड लावला जाऊ शकतो.

वारंवार चुका केल्या तर नोकरीवरून हटवण्याची तंबी डिलिव्हरी बॉयला दिली जाते.

जर विभागाकडून तुमचं ऐकलं जात नसेल तर तुम्ही ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार करून आर्थिक भरपाई मागू शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.