Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून 22 वर्षीय युवकानं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर गावात घडली आहे. केशव बाबुराव वनारे असं या तरुणाचं नाव असूनस त्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं आहे.
माकनेर गावातील केशव बाबुराव वनारे या 22 वर्षीय युवकांनी लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. केशव हा उच्चशिक्षित होता व अनेक दिवसांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता. मात्र लग्न जुळत नव्हतं व घरी शेती नसल्याने कुणी मुलगी ही देत नव्हतं. यामुळे नैराश्यातून केशवने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस तपास करत आहे. अलीकडे बुलढाणा जिल्ह्यात लग्न जुळत नसल्याच्या कारणावरून तरुणांमध्ये वाढत चाललेले नैराश्य व व्यसनाधीनता हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या दहा दिवसात बुलढाणा जिल्ह्यात लग्न न जुळल्याने ही तिसरी आत्महत्या आहे.